चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला, उल्हासनगर पोटनिवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 12:47 AM2018-03-27T00:47:27+5:302018-03-27T00:47:27+5:30

महापालिका प्रभाग क्रमांक १७ ची पोटनिवडणूक प्रतिष्ठेची करत आणि त्यातून ओमी टीमला चुचकारत राज्यमंत्री रवींद्र

Chavan's prestige, Ulhasnagar by-election | चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला, उल्हासनगर पोटनिवडणूक

चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला, उल्हासनगर पोटनिवडणूक

Next

उल्हासनगर : महापालिका प्रभाग क्रमांक १७ ची पोटनिवडणूक प्रतिष्ठेची करत आणि त्यातून ओमी टीमला चुचकारत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी राष्ट्रवादीविरोधात शड्डू ठोकला आहे. खुद्द ओमी कलानी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी, महापौर मीना आयलानी यांनीही प्रभागात ठाण मांडल्याने ही निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादीचे पक्ष निरीक्षक सुधाकर वडे यांनी आपल्या पक्षाच्या ताब्यातील जागा राखण्यासाठी उमेदवाराचा प्रचार सुरू केला आहे. त्याचवेळी प्रसिध्दीपत्रकावर पक्षाच्या शहरजिल्हाध्यक्षा व आमदार ज्योती कलानी यांचे फोटो झळकावत ओमी यांना थेट मात देण्याचा प्रयत्न केला आहे.
उल्हासनगर महापालिका प्रभाग क्रमांक-१७ मधून निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या पूजा कौर लबाना यांचे नगरसेवकपद रद्द झाले. त्याजागी ६ एप्रिलला ही पोटनिवडणूक होत आहे. ही जागा राखणे राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेचे असले, तरी भाजपाने ओमी टीमच्या गटातील साक्षी पमनानी यांना संधी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सुमन सचदेव, काँग्रेस पक्षातर्फे जया साधवानी आणि अपक्ष म्हणून सुरेखा सोनावणे निवडणूक रिंगणात आहेत. भाजपा व ओमी टीमने पोटनिवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले आहे. पक्षाच्या उमेदवार पमनानी याच निवडून येतील, असा दावा राज्यमंत्री चव्हाण यांनी केला असून प्रचारासाठी ते स्वत: रस्त्यावर उतरले आहेत. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपाचे कमळ फुलणार नाही, असा दावा त्या पक्षाचे गटनेते व नगरसेवक भरत गंगोत्री, नगरसेविका सुनीता बगाडे यांनी केला आहे. सचदेव यांनी घरोघरी जाऊन प्रचार सुरू केला आहे.
प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेसच्या माजी उपमहापौर जया साधवानी यांना निवडून द्या, असे आवाहन पक्षाचे शहरजिल्हाध्यक्ष डॉ. जयराम लुल्ला यांनी केले. काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीही प्रभागात डेरा दिला आहे.
प्रभाग १७ मधून गेल्यावर्षी निवडून आलेले चारही उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे होते. या प्रभागातील सिंधी, मराठी आणि अन्य भाषक मतांवर अपक्ष उमेदवार सुरेखा सोनावणे बाजी मारतील, असा दावा प्रा. सुरेश सोनावणे यांनी केला आहे.

Web Title: Chavan's prestige, Ulhasnagar by-election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.