ठाणे रेल्वे स्थानकावर वृद्धाला चावला कुत्रा, रेल्वे प्रवासी संघटना नाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 02:57 AM2017-10-13T02:57:32+5:302017-10-13T02:57:56+5:30
सकाळच्या धावपळीच्या वेळेत ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक-२ येथील भटक्या कुत्र्याने ७० वर्षीय शरद शेट्टी यांच्या पायाला चावा घेतल्याची घटना
ठाणे : सकाळच्या धावपळीच्या वेळेत ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक-२ येथील भटक्या कुत्र्याने ७० वर्षीय शरद शेट्टी यांच्या पायाला चावा घेतल्याची घटना गुरुवारी सकाळी १० वा.च्या सुमारास घडली. दरम्यान, प्रवाशांना अशा प्रकारे कुत्रे चावा घेत असतील, तर स्थानकात भटक्या कुत्र्यांचा वावर तातडीने थांबवण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघटनांनी केली आहे.
शेट्टी हे नेहमीप्रमाणे सकाळी ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक २ येथे आले होते. ते लोकलची वाट पाहत असताना, फलाटावर काही कुत्रे मोकाटपणे फिरत होते. त्या वेळी एका कुत्र्याने अचानक त्यांच्या पायाला चावा घेतला. स्थानकातील प्रथमोपचार केंद्रात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून ठाणे जिल्हा (सिव्हिल) रुग्णालयात हलवण्यात आले. या घटनेची ठाणे रेल्वे प्रबंधक कार्यालयात नोंद करण्यात आली आहे. ठाणे रेल्वे प्रवासी संघटनेने या घटनेबाबत नाराजी व्यक्त करून स्थानकात मोकाट फिरणा-या भटक्या कुत्र्यांचा वावर दिवसेंदिवस वाढला आहे. आतातरी तातडीने रेल्वे प्रशासनाने भटक्या कुत्र्यांचा वावर थांबवावा, अशी मागणी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी केली.