लग्नाचे आमिष दाखवून फसवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 06:01 AM2017-09-14T06:01:25+5:302017-09-14T06:01:51+5:30
विवाहसंबंध जुळवणा-या संकेतस्थळाच्या माध्यमातून ओळख झालेल्या महिलेस लग्नाचे आमिष दाखवून तिची आर्थिक फसवणूक करणा-या नायजेरियन युवकास ठाणे पोलिसांनी गजाआड केले. त्याच्याजवळून तीन बनावट पासपोर्ट जप्त केल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली.
ठाणे : विवाहसंबंध जुळवणा-या संकेतस्थळाच्या माध्यमातून ओळख झालेल्या महिलेस लग्नाचे आमिष दाखवून तिची आर्थिक फसवणूक करणा-या नायजेरियन युवकास ठाणे पोलिसांनी गजाआड केले. त्याच्याजवळून तीन बनावट पासपोर्ट जप्त केल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली.
ठाण्यातील वागळे इस्टेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणा-या एका महिलेने विवाहासाठी भारत मेट्रोमोनी डॉट कॉम या संकेतस्थळावर स्वत:चा तपशील दिला होता. या तपशिलाच्या आधारे अमादी क्लेमेंट या नायजेरियन युवकाने दिनेश चेवन या बनावट नावाने महिलेशी संपर्क साधला. हँगआउट अॅपच्या माध्यमातून त्याने महिलेशी संबंध वाढवून विश्वास संपादन केला. आपण दिल्ली विमानतळावर आल्याचे सांगून जास्त सामान असल्याने कस्टम ड्युटी भरण्यासाठी त्याने महिलेस पैशांची मागणी केली. त्याने दिलेल्या खात्यामध्ये महिलेने १ लाख ५७ हजार ७०० रुपये जमा केले. फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर महिलेने वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली. सायबर सेलने या प्रकरणाचा समांतर तपास करून तांत्रिक माहिती गोळा केली. त्याआधारे आरोपीचे वास्तव्य नवी दिल्ली येथे असल्याचे समजले. पोलिसांचे पथक नवी दिल्ली येथे पोहोचले असता आरोपीचे वास्तव्य असलेल्या इमारतीमधील नायजेरियन रहिवाशांनी आत प्रवेश केल्यानंतर इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराला बाहेरून कुलूप लावले जात असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पथकातील दोन शिपायांनी बाजूच्या इमारतीच्या टेरेसवरून आरोपीच्या इमारतीमध्ये प्रवेश केला. मुख्य प्रवेशद्वाराची चावी मिळवल्यानंतर संपूर्ण पथकाने प्रवेश करून अमादी क्लेमेंट याला अटक केली. आरोपीजवळून नामिबियाचा एक आणि दक्षिण आफ्रिकेच्या दोन बनावट पासपोर्टसह लॅपटॉप, पाच मोबाइल फोन, मोडेम, तीन सीमकार्ड आणि ६६ हजार रुपये रोख जप्त केल्याची माहिती सायबर सेलचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. याच पद्धतीने आरोपीने यापूर्वी आणखी दोन महिलांची फसवणूक केली होती. तीन वर्षांपासून तो भारतात अनधिकृतरीत्या वास्तव्यास असल्याची माहितीही पोलिसांनी या वेळी दिली. पीडितेने आरोपीसोबत एकदाही मोबाइल फोनवर संभाषण केले नव्हते. आरोपीस दीड लाख देण्यापूर्वी तिने थोडीफार खबरदारी घेतली असती, तर तो भारतीय नसल्याचे सहज समजले असते, असे डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी सांगितले.
मेट्रोमोनी वेबसाइटच्या मदतीने गरजू महिलांना हेरून त्यांची फसवणूक करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडतात. अशा घटनांमध्ये नायजेरियन युवकांचा सहभाग दिसतो. त्यामुळे अशा प्रकरणांत कुणालाही आर्थिक मदत करण्यापूर्वी महिलांनी खबरदारी घ्यावी.
- डॉ. संदीप भाजीभाकरे,
पोलीस उपायुक्त, सायबर सेल