नोकरीच्या आमिषाने ठाण्यातील बेरोजगारांची फसवणूक ७० लाखांच्या घरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 09:51 PM2018-10-08T21:51:21+5:302018-10-08T22:06:08+5:30
नोकरीला लावण्याच्या आमिषाने अनेकांची फसवणूक करणाऱ्या दत्तात्रेय ऊर्फ तुषार धुरी याच्याविरुद्ध आणखी तक्रारी वाढल्या असून त्याने तब्बल ४५ बेरोजगारांची ७० लाखांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.
ठाणे : बृहन्मुंबई महापालिकेत नोकरीला लावण्याच्या आमिषाने अनेकांची फसवणूक करणा-या दत्तात्रेय ऊर्फ तुषार धुरी याच्याविरुद्ध आणखी तक्रारी वाढल्या असून त्याने तब्बल ४५ जणांची ७० लाखांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. धुरीकडून आतापर्यंत नऊ लाख ४५ हजारांचा ऐवज हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुंबई महापालिकेमध्ये नोकरीच्या आमिषाने १४ बेरोजगारांची १८ लाख पाच हजारांची फसवणूक झाल्याची तक्रार ठाणेनगर पोलीस ठाण्यात २७ सप्टेंबर २०१८ रोजी दाखल झाली होती. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट -१ ने तपासाला सुरुवात केल्यानंतर ३४ बेरोजगारांची ५४ लाख ४७ हजारांची फसवणूक झाल्याचे उघड झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे आणि सहायक पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या पथकाने दत्तात्रेय धुरी, राहुल केळकर, प्रकाश गायकवाड आणि अनिकेत राणे या चौघांना २७ सप्टेंबर रोजी अटक केली. त्यांना ७ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली. रविवारी ठाणे न्यायालयाने प्रकाश आणि दत्तात्रेय यांना १० आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत, तर केळकर आणि राणे या दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
ठाकरे यांच्या पथकाने सहायक आयुक्त बाजीराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली यापूर्वीच बनावट ३६ नियुक्तीपत्रे, वैद्यकीय तपासणीची कागदपत्रे, लॅपटॉप आणि प्रिंटर अशी सामग्री हस्तगत केली. केळकर याच्याकडून दोन लाख ५० हजार रुपये, राणेकडून ४५ हजारांची रोकड, तर धुरी आणि प्रकाश यांच्या डोंबिवलीतील घरातून पाच लाख ५० हजारांचा मुद्देमाल असा नऊ लाख ४५ हजारांचा ऐवज जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. यातील मुख्य आरोपी धुरी हा नेहमीच सुटाबुटात वावरायचा. त्याने उत्कृष्ट बीएमसी एचआर अधिकारी असे स्मृतिचिन्ह हातात घेऊन फोटोही काढला होता. त्याच्या कारवरही तसा लोगो त्याने लावला होता. त्याच आधारे तो अनेकांना भूलथापा मारायचा. आता पोलिसांनी अटक केल्यानंतर मात्र तो आपण त्या गावचेच नसल्याचा आव आणत आहे. फसवणुकीतील रोकड कोणाकडे दिली, कशामध्ये गुंतवणूक केली, ही माहिती देताना टाळाटाळ करत आहे. त्याची बँक खातीही तपासण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.