बेकायदेशीर वस्तू असल्याची बतावणी करत फसवणूक, चितळसर पोलिस ठाण्यात गुन्हा
By जितेंद्र कालेकर | Published: February 26, 2024 12:22 AM2024-02-26T00:22:56+5:302024-02-26T00:23:10+5:30
आरोपींचा शोध सुरु
जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: तैवान देशात पाठवलेल्या पार्सलमध्ये बेकायदा वस्तू असल्याची बतावणी करीत ठाण्यातील ६४ वर्षीय रहिवाशाची ११ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती चितळसर पोलिसांनी रविवारी दिली.
ठाण्यातील आशर रेसिडेंन्सी भागातील हे ६४ वर्षीय तक्रारदार यांना २२ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास एका अनोळखी मोबाइलधारकाने फोन करून ‘तुमचे तैवान देशात पार्सल पाठवत आहे. ते मुंबई कस्टममंध्ये थांबविले आहे. त्यात बेकायदा वस्तू आहे,’ असे खोटे सांगितले. त्यानंतर तक्रारदार यांचा कॉल या भामटयाने मुंबई गुन्हे शाखा, अंधेरी पूर्व येथे ट्रान्सफर करण्याचा बनाव करून त्याच्या बॅक खात्यावर त्यांना ११ लाख रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करण्यास सांगून त्यांची आर्थिक फसवणूक केली. या प्रकाराबाबत मोबाइलधारक आरोपीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. यातील फरारी आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याचे चितळसर पोलिसांनी सांगितले.