डेबिटकार्डचे ‘क्लोनिंग’ करून फसवणूक
By admin | Published: January 3, 2017 05:24 AM2017-01-03T05:24:43+5:302017-01-03T05:24:43+5:30
डेबिटकार्डचे ‘क्लोनिंग’ करून एका वृद्धास २० हजार रुपयांनी फसवल्याची घटना बुधवारी ठाण्यात घडली. आॅनलाइन व्यवहार करताना ग्राहकाने दिलेली
ठाणे : डेबिटकार्डचे ‘क्लोनिंग’ करून एका वृद्धास २० हजार रुपयांनी फसवल्याची घटना बुधवारी ठाण्यात घडली. आॅनलाइन व्यवहार करताना ग्राहकाने दिलेली माहिती सुरक्षित नसल्याचे या घटनेतून स्पष्ट होत आहे.
ठाण्यातील आनंद पार्क भागात राहणारे उल्हास बर्वे (६३) यांनी बुधवारी त्यांचे ‘एमटीएनएल’चे कार्ड आॅनलाइन रिचार्ज केले. ‘एमटीएनएल’च्या मुंबई आणि दिल्लीसाठी दोन वेगवेगळ्या वेबसाइट आहेत. बर्वे यांनी त्यांचे कार्ड रिचार्ज करताना चुकून मुंबईऐवजी दिल्लीच्या वेबसाइटवर आॅनलाइन व्यवहाराची प्रक्रिया पूर्ण केली. चूक उमगल्यानंतर त्यांनी याबाबतची तक्रार ‘एमटीएनएल’च्या वेबसाइटवर नोंदवली. काही वेळातच ८८७९७५६४७२ क्रमांकाच्या मोबाइल फोनवरून राहुल नामक व्यक्तीने त्यांच्याशी संपर्क साधला. बर्वे यांनी ‘एमटीएनएल’कडे केलेल्या तक्रारीचा संदर्भ देत, त्यासाठी डेबिटकार्डाचा तपशील हवा असल्याचे त्याने सांगितले.
बर्वे यांनी तपशील दिल्यानंतर त्यांच्या युको बँकेच्या खात्यातून लगेच २० हजार रुपये परस्पर काढण्यात आले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर बर्वे यांनी लगेच त्यांचे डेबिटकार्ड ‘ब्लॉक’ केले. आरोपीने आपल्या डेबिट कार्डचे ‘क्लोनिंग’ (बनावट कार्ड तयार करणे) केले असावे किंवा पासवर्ड हॅक केला असावा, असा संशय बर्वे यांनी राबोडी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीमध्ये व्यक्त केला आहे. पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)