ठाण्यात सुटे पैसे मागण्याच्या बहाण्याने फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 09:18 PM2018-05-17T21:18:30+5:302018-05-17T21:18:30+5:30
एखाद्या व्यापाऱ्याची आधी रेकी करुन नंतर त्याला महिलेमार्फत फोन केल्यानंतर दोन हजारांच्या नोटांच्या बदल्यात पाचशेच्या नोटा मागून कोणत्याच नोटा न देता गंडा घालण्याचे प्रकार ठाण्यात वाढले आहेत.
ठाणे : सुटे पैसे मागण्याच्या बहाण्याने ठाण्यातील व्यावसायिकांना गंडा घालणारी टोळी शहरात कार्यरत असल्याची बाब उघड झाली आहे. एका महिलेसह चार ते पाच जणांचे हे टोळके पाचशेच्या नोटा मिळाल्यानंतर दोन हजारांच्या नोटा न देताच पसार होते. या टोळीला शोधण्याचे आता ठाणे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.
शहरातील कोणत्याही रुग्णालयाजवळील मोठा व्यापारी किंवा एखाद्या सराफाला एका महिलेचा फोन येतो. ‘मी या रुग्णालयात आहे. मला १० ते १५ तोळ्यांच्या बांगड्या गहाण ठेवायच्या आहेत. रुग्णालयात भरण्यासाठी पैशांची गरज आहे. माझ्याकडे दोन हजारांच्या ५० नोटा अर्थात एक लाख रुपये आहेत. त्याबदल्यात पाचशेच्या नोटा बदलून हव्या आहेत.’ हा कॉल करून संबंधित व्यापा-याला एखाद्या नामांकित रुग्णालयाचा पत्ता दिला जातो. संबंधित डॉक्टरचे नावही सांगितले जाते. प्रत्यक्षात व्यापारी पाचशेच्या नोटा घेऊन आल्यानंतर त्याला या रुग्णालयाच्या गेटवरच अडवले जाते. संबंधित डॉक्टर आणि रुग्णाच्या नातेवाइकांनीच आपल्याला तुमच्याकडून पैसे घेण्यास सांगितल्याचे गेटवरील व्यक्ती सांगतो. फोनवर संभाषण करणारी महिला याठिकाणी आलेली नसते. तिथे आलेल्या व्यापा-याकडून पाचशेच्या सर्व नोटा घेतल्या जातात. नंतर दोन हजारांच्या नोटा घेण्यासाठी आत जाण्याचा बहाणा ही व्यक्ती करते. पण, दोन हजारांच्या नोटाही तो आणत नाही आणि पाचशेच्या नोटाही घेऊन तो पसार होतो.
नौपाडा परिसरात गेल्या १५ दिवसांमध्ये अशा चार ते पाच घटना घटनांची नोंद झाली आहे. वागळे इस्टेट, वर्तकनगर, राबोडी, कापूरबावडी, कासारवडवली या पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातही गेल्या १५ दिवसांमध्ये प्रत्येकी दोन ते तीन घटना घडल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
नागरिकांनी किंवा व्यापा-यांनी अशा कोणत्याही एखाद्या अनोळखीच्या ताब्यात इतकी मोठी रक्कम देऊ नये. असे फोन करणा-यांची माहिती तत्काळ पोलिसांना द्यावी.
- संजय धुमाळ, पोलीस निरीक्षक, नौपाडा पोलीस ठाणे