जादा व्याजदराचे आमिष दाखवून साडेसात कोटींची फसवणूक, दोन महिलांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2017 11:02 PM2017-10-26T23:02:00+5:302017-10-26T23:02:21+5:30

जादा व्याजदराचे आमिष दाखवून ठाण्यासह महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या ८०० ते ९०० ठेवीदारांकडून सुमारे सात कोटी ५६ लाख २ हजारांची फसवणूक करणा-या अनुराधा फडणीस (५१) आणि शरयू विनायक ठकार

Cheating of seven and a half million showing fraud with excess interest rates, two women arrested | जादा व्याजदराचे आमिष दाखवून साडेसात कोटींची फसवणूक, दोन महिलांना अटक

जादा व्याजदराचे आमिष दाखवून साडेसात कोटींची फसवणूक, दोन महिलांना अटक

Next

ठाणे : जादा व्याजदराचे आमिष दाखवून ठाण्यासह महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या ८०० ते ९०० ठेवीदारांकडून सुमारे सात कोटी ५६ लाख २ हजारांची फसवणूक करणा-या अनुराधा फडणीस (५१) आणि शरयू विनायक ठकार (४९) या दोन महिलांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी रात्री अटक केली. त्यांना ३० आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले.
ठाण्याच्या चरईतील गुरुकृपा या इमारतीमध्ये ‘फडणीस ग्रुप आॅफ कंपनी’च्या माध्यमातून अनुराधा फडणीस आणि इतर सात ते आठ संचालकांनी जादा व्याजाच्या आमिषाने २००६ पासून शेकडो गुंतवणूकदारांच्या वेगवेगळ्या रकमांच्या ठेवी स्वीकारल्या. या खासगी वित्त कंपनीने २०१३ पर्यंत गुंतवणूकदारांना त्यांचे पैसेही परत केले. अशा प्रकारे लोकांमध्ये विश्वास निर्माण करून २०१३ नंतर आलेल्या गुंतवणूकदारांचे मुद्दल किंवा व्याजाचेही पैसेही त्यांनी परत केले नाही. याप्रकरणी २७ एप्रिल २०१७ रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात विनय फडणीस, त्याची पत्नी अनुराधा फडणीस (५१), भाग्यश्री गुरव (३९) आणि शरयू ठकार (४९) अशा सात संचालकांविरुद्ध फसवणुकीसह महाराष्टÑ ठेवीदारांच्या वित्तीय संस्थेच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला होता. हा गुन्हा ठाणे आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. याप्रकरणी यापूर्वीच विनय फडणीस याला ४ मे २०१७ रोजी, तर भाग्यश्री गुरव हिला ३० मे २०१७ रोजी अटक झाली आहे. या संचालकांनी पुणे आणि नाशिक परिसरांतही असेच फसवणुकीचे प्रकार केल्यामुळे अनुराधा आणि शरयू या दोघींना नाशिक पोलिसांनी अलीकडेच फसवणुकीच्या प्रकरणात अटक केली होती. ही माहिती मिळताच ठाणे आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त शांताराम अवसरे यांच्या पथकाने नाशिकमधून या दोघींचाही ताबा घेतला आणि त्यांना २५ आॅक्टोबर रोजी रात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास अटक केली. २०१३ पासून या संचालकांनी अनेकांची फसवणूक केल्यामुळे ठाणे पोलिसांनी या दोन संचालक महिलांना अटक केल्याची माहिती मिळाल्यानंतर अनेक गुंतवणूकदारांनी ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात गुरुवारी गर्दी केली होती. यातील सायली आणि साहिल फडणीस या दोन आरोपींचाही शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांनी दिली. फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांकडेही चौकशी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

Web Title: Cheating of seven and a half million showing fraud with excess interest rates, two women arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.