शहापूरच्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचा स्काऊट गाईडच्या शिबिराला जल्लोष!
By सुरेश लोखंडे | Published: February 13, 2024 04:35 PM2024-02-13T16:35:13+5:302024-02-13T16:35:20+5:30
शहापूरजवळील आघई येथील आत्मा मालिक स्कूलच्या आवारात या स्काऊड गाईडच्या शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद विद्यार्थ्यांनी दिला.
ठाणे : येथील जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभाग व ठाणे भारत स्काऊट्स आणि गाईडस जिल्हा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शहापूर तालुक्या ग्रामीण, दुर्गम भागाच्या गांवखेड्यामधील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शेकडो विद्यार्थ्यांनी कब बुलबुल, स्काऊट आणि गाईडच्या तालुकास्तरीय शिबिरात मोठ्या संख्येने सहभाग घेऊन ते यशस्वीरित्या पूर्ण केले.
शहापूरजवळील आघई येथील आत्मा मालिक स्कूलच्या आवारात या स्काऊड गाईडच्या शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद विद्यार्थ्यांनी दिला. शहापूर तालुक्यातील १५ जिल्हा परिषद शाळेतील १ ली ते ८ वी च्या विदयार्थी आणि विध्यार्थिनीनी या शिबिरात सहभाग घेतला. यावेळी शारीरिक प्रात्यक्षिक, सांस्कृतिक कार्यक्रम, शोभायात्रा संस्कृती दर्शन इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच विविध आनंददायी खेळ घेण्यात आले. या स्पर्धेत विजयी आणि सहभाग होणाऱ्या संघास प्रथम, द्वितीये तृतीय तसेच सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. या शिबिराच्या समारोप प्रसंगी बक्षीस वितरण करतांना सहाय्यक आयुक्त स्काऊट चिंतामण वेखंडेसह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.
या शिबिराचे उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आत्मा मलिक संस्थेचे व्यवस्थापक उमेश जाधव, शिक्षण विस्तार अधिकारी प्राजक्ता राऊत, समग्र शिक्षा अभियानचे तानाजी विशे हे उपस्थित होते, या मेळाव्याचे आयोजन शिक्षणाधिकारी डॉ.भाऊसाहेब कारेकर, ठाणे भारत स्काऊट चिटणीस किरण लहाने आणि हेमांगी पाटील यांचे मार्गदर्शन लाभल्याचे स्काऊट सहाय्यक आयुक्त चिंतामण वेखंडे यांनी 'लोकमत'ला सांगितले.