चेंबूर लैंगिक अत्याचारप्रकरणी एसआयटी नेमण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2019 05:33 AM2019-09-01T05:33:26+5:302019-09-01T05:33:33+5:30

राज्य महिला आयोग । मुंबई पोलिसांना नातेवाइकांना संरक्षण देण्याचे निर्देश

Chembur orders SIT for sexual assault | चेंबूर लैंगिक अत्याचारप्रकरणी एसआयटी नेमण्याचे आदेश

चेंबूर लैंगिक अत्याचारप्रकरणी एसआयटी नेमण्याचे आदेश

Next

औैरंगाबाद/मुंबई : जालना जिल्ह्यातील एका महिलेवर मुंबईतील चुनाभट्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अत्याचार करण्यात आले. पीडितेचे चार दिवसांपूर्वी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात निधन झाले. या गंभीर घटनेप्रकरणी राज्य महिला आयोगाने शनिवारी ‘एसआयटी’स्थापन करण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात मुंबई पोलिसांनी पीडितेच्या नातेवाईकांना पोलीस संरक्षणही देण्याची सूचना करण्यात आली
आहे.

शनिवारी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पीडित युवतीचे बंधू आणि नातेवाईकांची भेट घेतली. त्यांनी चुनाभट्टी पोलीस स्थानकात मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे, अतिरिक्त पोलीस आयुक्त लख्मी गौतम, पोलीस उपायुक्त शशि मीना यांच्या उपस्थितीत पीडितेचे बंधू, त्यांचे नातेवाईक आणि सहकाऱ्यांशी तपशीलवार चर्चा केली. पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी या घटनेचा तपास सीआयडीकडे त्वरीत सोपविण्यात येईल. त्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमले जाईल.

उन्नाव सारखी घटना घडू नये
यादृष्टीने बैठकीत पीडित तरुणीच्या भावाला पोलीस संरक्षण दिले
जाईल. प्रारंभिक तपास करताना मुंबईच्या पोलीस निरीक्षक शिर्के
यांनी पीडितेच्या भावाला नीट वागणूक दिली नसल्याचा आरोप लक्षात घेऊन त्यांची चौकशी
करावी आणि त्याआधारे योग्य ती कारवाई करावी. औरंगाबादच्या
घाटी रूग्णालयात तज्ज्ञ डाक्टरांच्या पथकाने शवविच्छेदन करावे. या घटनेमध्ये ‘मनोधैर्य’ योजनेंतर्गत पीडितेच्या कुटुंबीयांना आर्थिक सहाय्य त्वरीत देण्यात यावे. त्यासाठी सर्व प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याच्या निर्देश संबंधितांना देण्यात आले आहेत.

चुनाभट्टी स्थानकाला छावणीचे स्वरुप
चेंबूर येथील सामूहिक बलात्कार प्रकरण व तरुणीच्या झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ शुक्रवारी छेडण्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या आंदोलनानंतर, शनिवारी चुनाभट्टी पोलीस ठाण्यावर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची निवेदन देण्यासाठी रीघ लागली होती. पोलीस ठाण्याच्या आत प्रवेश नाकारल्याने गेटबाहेरच कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती.

कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी चुनाभट्टी पोलीस ठाण्याबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दुपारच्या सुमारास पोलिसांनी गेट बाहेर येऊन सर्व पक्षांची निवेदने स्वीकारली. यानंतर, काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांची गर्दी व पोलीस बंदोबस्तामुळे सकाळपासून पोलीस ठाणे परिसरात तणावाचे वातावरण होते.

चेंबूरच्या सामूहिक बलात्कार करण्यात आलेल्या १९ वर्षीय तरुणीचा बुधवारी मृत्यू झाला. या घटनेला एक महिना उलटूनदेखील आरोपी मोकाट आहेत. पोलीस आरोपींना का पकडू शकले नाहीत, असा प्रश्न या वेळी कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी सर्व कार्यकर्त्यांनी केली.

Web Title: Chembur orders SIT for sexual assault

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.