भिवंडीत केमिकल गोदामाला भीषण आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:43 AM2021-04-28T04:43:40+5:302021-04-28T04:43:40+5:30
भिवंडी : भिवंडीत आग लागण्याचे सत्र थांबता थांबत नसून गोदाम पट्ट्यातील पूर्णा गावात असलेल्या सिमला कम्पाउंड येथे केमिकल गोदामाला ...
भिवंडी : भिवंडीत आग लागण्याचे सत्र थांबता थांबत नसून गोदाम पट्ट्यातील पूर्णा गावात असलेल्या सिमला कम्पाउंड येथे केमिकल गोदामाला भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली आहे. या आगीत संपूर्ण केमिकल गोदाम जळून खाक झाले आहे. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत दाेन तासांनी या आगीवर नियंत्रण मिळवले आहे.
पूर्णा गावात असलेल्या सिमला कम्पाउंड येथील गाला नंबर १२ येथे विनोद तिवारी यांचे केमिकल गोदाम आहे. या गोदामात अमोनियम क्लोराइड, कॅल्शियम कार्बोनेट, पीव्हीसी पावडर, स्टोनिक ॲसिड, हायड्रोजन अशा वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल साठवून ठेवले होते. दुपारी अचानक या केमिकल गोदामाला भीषण आग लागली. या केमिकल गोदामाच्या बाजूला केमिकलची इतरही अनेक गोदामे असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले होते. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी भिवंडी अग्निशमन दलाची एक गाडी घटनास्थळी दाखल झाली. तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर फोमच्या साहाय्याने अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले. ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती मिळालेली नाही. मात्र भिवंडीतील पूर्णा व इतर अनेक रहिवासी ठिकाणी केमिकल साठविण्यास बंदी आहे. मात्र गाेदाम मालक अवैध पद्धतीने केमिकलची येथे साठवणूक करत आहेत. त्यामुळे या केमिकल गोदामांना आग लागण्याच्या घटना नेहमीच घडत असतात. स्थानिक पोलीस व महसूल प्रशासन या केमिकल गोदामांवर कोणतीही कारवाई करताना दिसत नाहीत. या आगीची नोंद नारपोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.