खंबाळपाडा परिसरात रासायनिक पाणी रस्त्यावर; परिसरात दुर्गंधी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 08:52 PM2018-11-27T20:52:38+5:302018-11-27T20:54:18+5:30
रासायनिक पाण्याची टाकी झाली ओव्हरफ्लो
डोंबिवली: येथील खंबाळपाडा परिसरातील रासायनिक पाण्याचा साठा करणारी, तसेच ते पाणी वाहून नेणारी टाकी ओव्हरफ्लो झाल्याची घटना मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास निदर्शनास आली. लाल रंगाचे घाण, उग्र दर्पाचे पाणी रस्त्यावरील नाल्यामध्ये पसरल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली होती. याचा त्रास पादचारी, वाहनाचलक, कामगारांना झाला.
महिनाभरापूर्वीच या परिसरात कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली असतानाही प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी विभाग सतर्क कसा होत नाही, असा सवाल भाजपाचे स्विकृत नगरसेवक राजन सामंत यांनी केला. सामंत त्या ठिकाणावरून जात असताना त्यांना ही टाकी ओव्हरफ्लो झाल्याचे लक्षात आले. ते म्हणाले की, हरित लवादाने प्रदूषण मंडळाला कोट्यवधींचा दंड ठोठावला. पण तरीही यंत्रणा मात्र सुधारलेली नाही. त्यामुळे आता संबंधित अधिकाऱ्यांच्या वेतनामधून हा खर्च वसूल करावा, तसेच जे कोणी दोषी असतील त्यांचे निलंबन करावे. यासंदर्भात उद्योग विकास मंत्र्यांनाही पत्रव्यवहार करणार असून प्रदूषण विभागाकडेही तक्रार करणार असल्याचे सामंत म्हणाले. कंपन्यांच्या आणि स्वत:च्या चांगभल्यासाठी नागरिकांचा जीव धोक्यात का घातला जातो, असा सवाल करत सामंत यांनी लाल रंगाचे रसायन मिश्रीत पाण्याचे फोटो व्हायरल केले.
एकीकडे कंपन्यांचे सांडपाणी कुठेही रस्त्यावर येत नसल्याचा दावा महामंडळ, एमआयडीसी अधिकारी करतात तर मग खंबाळपाड्यातील टाकीतून बाहेर पडणारे जे लाल पाणी आहे, ते काय आहे असा सवाल त्यांनी केला. त्यामुळे काम झाल्याचा दावा कोणीही करू नये, प्रत्यक्ष वस्तूस्थितीचा अभ्यास करावा असेही सामंत म्हणाले. यासंदर्भात महासभेमध्येदेखील आवाज उठवणार असून कंपन्यांपेक्षा नागरिकांच्या जीवाला महत्व द्या, असेही ते म्हणाले. यासंदर्भात एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता संजय ननावरे यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.