ऑनलाईन औषध विक्रीला विरोध करणारा केमिस्टचा हल्लाबोल मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 08:29 PM2019-01-08T20:29:58+5:302019-01-08T20:32:38+5:30
जनस्वास्थ धोक्यात आणणाऱ्या ई-फार्मसी औषध विक्री विरोधात आज ठाणे जिल्ह्यातील केमिस्ट बांधवांनी जिल्हाधिकारी व अन्न व औषध प्रशासन वर हल्लाबोल मोर्चा नेला.
डोंबिवली - जनस्वास्थ धोक्यात आणणाऱ्या ई-फार्मसी औषध विक्री विरोधात आज ठाणे जिल्ह्यातील केमिस्ट बांधवांनी जिल्हाधिकारी व अन्न व औषध प्रशासन वर हल्लाबोल मोर्चा नेला. या मोर्चात जिल्ह्यातील असंख्य केमिस्ट बांधवांनी सहभाग नोंदवीत प्रशासनाचे लक्ष केंद्रित केले होते.
जिल्हाधिकारी नार्वेकर व अन्न व औषध प्रशासन सह आयुक्त विराज पौणिकर यांना जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख, सचिव विजय सुराणा, विलास जोशी, विनय खटाव, शमी शेख, जगदीश बिर्ला, बाळू नेहेते, नितीश भुसारी यांनी निवेदन सादर करून केमिस्टच्या भावना प्रशासन पर्यंत पोहोचविल्यात.
मद्रास व दिल्ली हायकोर्टाने बेकायदेशीर ई-फार्मसी वर स्टे दिला असतांना त्याची अंमलबजावणी तात्काळ करण्याची विनंती करण्यात आली. प्रशासनाने देखील जनतेचे आरोग्य धोक्यात येऊ देणार नाही ई-फार्मसी ला कधीही सहकार्य केले जाणार नसल्याचे आस्वासन देण्यात आले.
मोर्चात ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, कळवा, मुंब्रा, मीरा रोड, बदलापूर, उल्हासनगर परिसरातील पदाधिकारी व केमिस्ट बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशासनाने ऑनलाईन औषध विक्री विरोधात त्वरित कारवाई केली नाही तर भविष्यात अखिल भारतीय विक्रेता संघ अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन तीव्र स्वरूपात करण्यात येईल असे अध्यक्ष दिलीप देशमुख व सचिव विजय सुराणा यांनी शेवटी सांगितले.