श्रावणसोहळ्यात ठाण्यातील सखी चिंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 05:44 AM2017-08-11T05:44:42+5:302017-08-11T05:45:39+5:30
संस्कृतीवर्धक मंगळागौरीचे खेळ, श्रावणाची आठवण करून देणारी धमाल गाणी, नृत्य, कलाकारांसोबत गप्पाटप्पा आणि बक्षिसांची लयलूट या उत्साही वातावरणात सखींनी चिंब होण्याचा आनंद घेतला. निमित्त होते, लोकमत सखी मंच आयोजित मेडिमिक्स श्रावणसोहळ्याचे.
ठाणे : हिरवा शालू ल्यालेल्या सृष्टीशी मेळ घालीत परिधान केलेले गर्द हिरवे पोशाख, पानाफुलांचा कल्पक वापर करीत तयार केलेली आभूषणे घालून सजलेल्या सखी, मजेदार उखाणे, हातावर रेखाटलेली एकापेक्षा एक सरस मेहंदी डिझाइन, सोबत संस्कृतीवर्धक मंगळागौरीचे खेळ, श्रावणाची आठवण करून देणारी धमाल गाणी, नृत्य, कलाकारांसोबत गप्पाटप्पा आणि बक्षिसांची लयलूट या उत्साही वातावरणात सखींनी चिंब होण्याचा आनंद घेतला. निमित्त होते, लोकमत सखी मंच आयोजित मेडिमिक्स श्रावणसोहळ्याचे.
लोकमत सखी मंच आणि मेडिमिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यातील टीपटॉप प्लाझा येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मेडिमिक्सचे नंदलाल उपाध्याय, गीता विसवानी, विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आणि नगरसेवक संजय वाघुले, लोकमतचे सहायक उपाध्यक्ष विजय शुक्ला, टीपटॉप प्लाझाचे सर्वेसर्वा रोहितभाई शहा, डॉ. त्वचा प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. अमित कारखानीस, युनिक अॅडव्हर्टायझिंगचे अविनाश मिश्रा, लोकमत ठाणेचे सहायक सरव्यवस्थापक राघवेंद्र शेट यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन लोकमत सखी मंचचे होते. प्रस्तुतकर्ता मेडिमिक्स आयुर्वेदिक फेसवॉश, सहप्रस्तुतकर्ता स्टार प्रवाह, लाइफस्टाइल पार्टनर रिसो राइस ब्रॅन आॅइल हे होते. खारघरच्या परंपरा ग्रुपने मंगळागौरीचे खेळ सादर केले. भक्ती घाडगे यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. परीक्षक व मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. कुणाल रेगे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास सखी मंच सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. कारखानीस यांनी सखींनी आपल्या त्वचेची आणि केसांची काळजी कशी घ्यावी, त्यासाठी दररोजच्या आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश असावा, याची नेमकी माहिती दिली.
सहप्रस्तुतकर्ता स्टार प्रवाहांतर्गत प्रश्नोत्तरे, उखाणे आदी विविध स्पर्धांद्वारे माधुरी अत्तरदे यांना ‘स्टार प्रवाहची महाराणी’ घोषित करण्यात आले.
त्याचबरोबर स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘कुलस्वामिनी’ मालिकेतील कलाकार आरोही (रश्मी अनपट) यांची उपस्थिती श्रावण सोहळ्यास चार चॉँद लावून गेली.
या वेळी आरोहीने सखींना मालिकेसंबंधी प्रश्न विचारून विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली. तसेच स्टार प्रवाहांंतर्गत घेण्यात आलेल्या राउंडमध्ये सखी स्पर्धकांसमवेत धमाल केली.
मेडिमिक्स श्रावण सखी स्पर्धा : श्रावण सोहळ्यांतर्गत मेडिमिक्स हर्बल फॅशन शो अर्थात श्रावण साज स्पर्धा, मेडिमिक्स उखाणा स्पर्धा आदी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. फॅशन शोमध्ये अश्विनी शिंदे, सुचिता सावंत आणि सुलभा देशपांडे यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. तर, मेडिमिक्स उखाणा स्पर्धेत माधवी भसे आणि सीताबाई म्हात्रे यांना बक्षिसे देण्यात आली.