‘छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाची इमारत पाच वर्षांत पडणार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 12:16 AM2019-08-28T00:16:13+5:302019-08-28T00:16:41+5:30
ठाणे : कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाची इमारत स्ट्रक्चरल आॅडिटमध्ये धोकादायक झाल्याचे निष्पन्न झाले आहे. परंतु , निधीची कमतरता ...
ठाणे : कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाची इमारत स्ट्रक्चरल आॅडिटमध्ये धोकादायक झाल्याचे निष्पन्न झाले आहे. परंतु , निधीची कमतरता असून वेळेत तिची दुरुस्ती झाली नाही तर ती पाच वर्षांत पडेल,असा धक्कादायक आरोप रुग्णालयाच्या डीन संध्या खडसे यांनी केला. सध्या तिची अवस्था भीषण असून भिंतीचे पोपडे पडणे, बुरशी लागणे, सफाईकामगार आणि सुरक्षारक्षकांची अपुरी संख्या यामुळे सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर असल्याचे सांगून त्यांनी आपल्याच प्रशासनाविरोधात आवाज उठवला.
या रुग्णालयातील डॉक्टरांनाच डेंग्यूची लागण झाल्याचे वृत्त मंगळवारी लोकमतमध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने दुपारी १२ च्या सुमारास रुग्णालयाची पाहणी केली. तसेच आजाराने ग्रस्त असलेल्या डॉक्टरांचीही विचारपूस केली. यावेळी पत्रकारांशी बोलतांना खडसे यांनी कळवा रुग्णालयातील असुविधांचा पाढा वाचला.
रुग्णालयाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
या रुग्णालयात १७ विभाग असून याठिकाणी रोज ओपीडीला १६०० ते १८०० रुग्ण येत आहेत. दिवसाला २५ ते ३० विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया होत आहेत. तर २०० हून अधिक रुग्ण हे उपचारासाठी येथे दाखल होत असतात. परंतु, ही इमारत २५ वर्षांहून अधिक काळ जुनी आहे. दोन वर्षांपूर्वी तिचे स्ट्रक्चरल आॅडिट केले होते. त्यानसार ती धोकादायक स्थितीत आली असून तिची दुरुस्ती गरजेची असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. दुरुस्तीसाठी निधी मिळत नसल्याचा ठपकाही त्यांनी प्रशासनावर ठेवला. भिंतीना रंग नाही, बुरशी लागलेली आहे, इतर अनेक असुविधा आहेत, कुठे पोपडे पडत आहेत. अशी विविध समस्या असून त्या सोडवल्या जात नाही. मात्र,दुसरीकडे काही मंडळींकडून या ठिकाणचे मेडिकल कॉलेज हे पांढरा हत्ती असल्याचा उल्लेख केला जात असून ते बंद करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. दुरुस्तीसाठी जो निधी मिळतो तो सुद्धा तुटपुंजा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
अपुऱ्या सुविधा : मुलांसाठी होस्टेल नाही, एका एका रुममध्ये तीन ते चार जण राहत आहेत, डक्ट जुने आहेत, भिंती ओलसर झाल्या आहेत, त्यामुळे येथील डॉक्टर आजारी पडत असल्याचा धक्कादायक आरोप त्यांनी केला.
सुरक्षारक्षकांची संख्याही कमी
सफाईकामगारांची संख्या ४० ते ४५ ही तुटपुंजी असून सुरक्षारक्षकांची संख्याही १७२ आवश्यक असतांनाही केवळ ५० ते ६० सुरक्षारक्षक कार्यरत असून येथे चोरीची घटना घडल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
डेंग्यूचे रोज येतात तीन रुग्ण
येथील कॅबलॅबबाबतही त्यांनी यावेळी आक्षेप घेतला आहे. पीपीपी तत्वावर हे काम केले जात असून त्याठिकाणी एसीमधून पाणी गळत असल्याने त्याचा त्रास डॉक्टरांना होत असल्याचेही त्यांनी सांगितले. रुग्णालयात रोज तीन रुग्ण हे डेंग्यूचे रुग्ण उपचारासाठी दाखल होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
अन्यथा आंदोलन करू
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालायत ज्या काही असुविधा आहेत, त्या दूर झाल्या पाहिजेत, यासाठी आम्ही प्रशासनाला सात दिवसांची मुदत देत आहोत. परंतु, त्यानंतरही त्यात सुधारणा झाली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन होईल.
- मनोज शिंदे, शहर अध्यक्ष - काँग्रेस
मेडिकल तीन वर्षांपासून बंद
सर्वसामान्यांना औषधे मिळावीत म्हणून येथे मेडिकल स्टोअर असणे अपेक्षित आहे. मात्र, मागील तीन वर्षांपासून ते बंद आहे. परंतु, आता ते आपल्या मर्जीतील ठेकेदाराला मोफत देण्याचा घाट घातला जात आहे.
- विक्रांत चव्हाण, गटनेते, काँग्रेस