‘त्या’ हल्लेखोराला बेड्या, नौपाडा पोलिसांनी लावला छडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 03:24 AM2018-05-16T03:24:22+5:302018-05-16T03:24:22+5:30
मासुंदा तलाव परिसरातील एका सोळावर्षीय तरुणीवर मिरचीपूड फेकून हल्ला करण्याच्या बेतात असलेल्या अब्दुल समद नूरमहंमद शाखानी (२१, रा. मुंब्रा ) याला नौपाडा पोलीस आणि पोलीस उपायुक्त यांच्या विशेष पथकाने रविवारी मुंब्य्रातून जेरबंद केल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त अभय सायगावकर यांनी दिली.
ठाणे : मासुंदा तलाव परिसरातील एका सोळावर्षीय तरुणीवर मिरचीपूड फेकून हल्ला करण्याच्या बेतात असलेल्या अब्दुल समद नूरमहंमद शाखानी (२१, रा. मुंब्रा ) याला नौपाडा पोलीस आणि पोलीस उपायुक्त यांच्या विशेष पथकाने रविवारी मुंब्य्रातून जेरबंद केल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त अभय सायगावकर यांनी दिली. त्याला १७ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
ठाण्यात राहणारी ही तरुणी चरई येथील डान्स क्लासमधून घरी पायी जात असताना २५ एप्रिल २०१८ रोजी रात्री ८.१५ वाजण्याच्या सुमारास समोरून येऊन शाखानी याने मिरचीची पूड तिच्या डोळ्यांवर टाकून हल्ला केला होता. अनपेक्षितपणे अचानक झालेल्या या हल्ल्याने या मुलीने जीवाच्या आकांताने आरडाओरडा केला. तिच्या डोळ्यांत मिरचीची पूड गेल्यामुळे ती तिथेच आक्रोश करत बसली. तिच्या आक्रोशाने जमावानेच तिला सावरले आणि पोलिसांनाही पाचारण केले. नौपाडा पोलिसांनी तिला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखलही केले. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य पाहून सहपोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांनी घटनास्थळापासून दोन ते तीन किलोमीटर परिसरातील ७० ते ८० सीसीटीव्हींची पडताळणी केली. त्यात एका इलेक्ट्रॉनिक दुकानातील सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाल्याचे आढळले. त्यातून अब्दूलला मुंब्य्रातून अटक करण्यात आली.
>त्याला नशेची सवय असून मासुंदा तलावाभोवती फिरताना पाहिलेली प्रेमीयुगुले पाहून आपल्यालाही एखादी गर्लफ्रेण्ड असावी, या असूयेपोटी हे कृत्य केल्याची त्याने कबुली दिली. तो माथेफिरू असल्याचीही शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्याने कोणावर आणखी एखादा असाच प्रकार करण्यापूर्वी तो पकडण्यात यश आल्याचे सायगावकर यांनी सांगितले.