फळपिक विम्यासाठी चिकू उत्पादक शेतकऱ्यांनी तत्काळ करावी नोंदणी! - माने
By सुरेश लोखंडे | Published: June 14, 2024 05:33 PM2024-06-14T17:33:19+5:302024-06-14T17:33:27+5:30
या योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करणे बंधनकारक आहे. एका शेतकऱ्यास अधिसूचित फळपिकासाठी मृग व आंबिया बहार मिळून जास्तीत जास्त ४ हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करण्याची मुभा आहे.
ठाणे : कोकण विभागातील ठाणे व पालघर जिल्ह्यामध्ये चिकू फळपीक मृग बहरासाठी अधिसूचित आहे. पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेच्या १२ जून रोजीच्या कृषि व पदुम विभागाच्या शासन निर्णयानुसार या दोन वर्षाकरिता राबविण्यात येत आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी ठाणे व पालघर जिल्ह्यातील चिकू उत्पादक शेतकऱ्यांनी ३० जूनपूर्वी अर्ज करावे, असे आवाहन कोकण विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांनी केले आहे.
फळपिक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित फळपिकांसाठी ऐच्छिक आहे. योजनेत सहभागी होण्यासंबंधी अथवा सहभागी न होण्याबाबत घोषणपत्र ज्या बँकेमध्ये पीककर्ज खाते, किसान क्रेडिट कार्ड खाते आहे, तिथे जमा करणे आवश्यक आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी न होण्याबाबत घोषणापत्र योजनेत सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या ७ दिवस अगोदर बँकेला देणे आवश्यक आहे. जेणेकरुन बँक विमा हप्ता परस्पर कपात करणार नाही. जे कर्जदार शेतकरी विहित मुदतीत सहभागी न होण्यासाठी बॅंकांना कळविणार नाहीत, असे शेतकरी योजनेत सहभागी आहेत, असे गृहित धरण्यात येईल व त्या शेतकऱ्यांचा विमा हप्ता विहित पद्धतीने कर्ज खात्यातून वजा करण्यात येईल, असे माने यांनी स्पष्ट केले.
या योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करणे बंधनकारक आहे. एका शेतकऱ्यास अधिसूचित फळपिकासाठी मृग व आंबिया बहार मिळून जास्तीत जास्त ४ हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करण्याची मुभा आहे. कोकण विभागाकरीता प्रति शेतकरी सहभागासाठी एका फळपिकाखालील कमीत कमी उत्पादनक्षम क्षेत्र १० गुंठे (०.१० हे.) व बागेचे वय ५ वर्षे असणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० जून आहे, असे माने यांनी सांगितले.