जिल्हाधिकारी मोठे की मत्स्य सहआयुक्त? मासेमारी आदेश-खुलाशावरून संभ्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 11:59 PM2021-04-13T23:59:03+5:302021-04-13T23:59:30+5:30
Palghar : जिल्हाधिकाऱ्यांनी ‘मिशन ब्रेक द चेन’ आदेशातील ठळक बाबी जाहीर करताना अत्यावश्यक बाबीमध्ये लाखो कुटुंबांच्या उत्पन्नाच्या मासेमारी व्यवसायाबाबत कुठलाही स्पष्ट उल्लेख केलेला नव्हता.
पालघर : कोरोना संक्रमण रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून जाहीर करण्यात आलेल्या आदेशात मासेमारी, मासे खरेदी आणि मासे विक्री ही बाब अत्यावश्यक सेवेमध्ये नमूद करण्यात आली नसताना मत्स्य व्यवसाय सहआयुक्त आनंद पालव यांनी मात्र अ.भा. मांगेला समाज परिषदेचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांना मासेमारी, खरेदी-विक्री ही अत्यावश्यक बाब असल्याचा खुलासा केल्याने जिल्हाधिकारी मोठे की सहआयुक्त? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी ‘मिशन ब्रेक द चेन’ आदेशातील ठळक बाबी जाहीर करताना अत्यावश्यक बाबीमध्ये लाखो कुटुंबांच्या उत्पन्नाच्या मासेमारी व्यवसायाबाबत कुठलाही स्पष्ट उल्लेख केलेला नव्हता. त्यामुळे मासेमारी, विक्री आणि वाहतुकीबाबत नेमके आदेश काय? याबाबत मच्छीमारांमध्ये संभ्रम होता. यामुळे सोमवारी अध्यक्ष देवेंद्र तांडेल, जिल्हाध्यक्ष विनोद पाटील, युवाध्यक्ष पुनित तांडेल, युवाध्यक्ष भावेश तामोरे, युवा सचिव दीपेश तामोरे आदींच्या शिष्टमंडळाने सहआयुक्त पालव यांची भेट घेत त्यांना निवेदन सादर केले. यावेळी सहआयुक्तांनी चिकन, पोल्ट्री, मटण, अंडी व मासळी दुकानांचा उल्लेख अत्यावश्यक सेवेत केल्याचे समितीला सांगितले. याबाबत सहआयुक्त आनंद पालव यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
आदेशात उल्लेख नाही
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात मासे विक्रीबाबत स्पष्ट उल्लेख नसल्याने मच्छीमारांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश पाळावेत की, सहआयुक्त आनंद पालव यांनी शासन आदेशाच्या प्रतीचा आधार घेत मासेमारी, विक्री, वाहतूक याला परवानगी असल्याचे शिष्टमंडळाला सांगितल्याने त्यांचे आदेश पाळावेत? असा प्रश्न मच्छीमारांपुढे निर्माण झाला आहे.