"बळकट लोकशाहीसाठी तरुणांनी मतदार यादीत समाविष्ट व्हावे"
By सुरेश लोखंडे | Published: November 18, 2022 07:41 PM2022-11-18T19:41:13+5:302022-11-18T19:52:13+5:30
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क, सुरेश लोखंडे, ठाणे: देशाच्या समृद्ध, सुजाण व बळकट आणि पारदर्शक लोकशाही प्रक्रियेसाठी तरुणांनी मतदार यादीत नाव नोंदणी करून मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन यावेळी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी आज महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना केले. येथील के.ग. जोशी कला व ना. गो. बेडेकर वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गत आयोजित केला असता त्यासाठी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे ठाण्यात आले होते.
ठाणे जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय आणि के.ग. जोशी कला व ना. गो. बेडेकर वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गत ‘लोकशाही गप्पा व मतदार नोंदणी’परिसंवादात आयोजित कार्यक्रमाला देशपांडे, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे,उपजिल्हा निवडणूक अर्चना कदम, मतदार नोंदणी अधिकारी पवन चांडक, सहाय्यक अर्चना घोलप, केंद्रस्तरीय अधिकारी संतोष सेंद्रे, उपविभागीय अधिकारी अविनाश शिंदे, तहसीलदार नागोराव लोखंडे, युवराज बांगर, जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या प्राचार्य सुचित्रा नाईक आदी उपस्थित हाेते.
मतदार यादीत नाव येण्यासाठी काय करावे लागेल, कोणता फॉर्म भरावा लागेल, अर्ज ऑनलाईन करायचा की ऑफलाईन, मतदार यादीत नावासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतील, अर्ज कुठे करावा, नाव नोंदणी अर्ज सादर करणे ते ओळखपत्र मिळणे या दरम्यान किती वेळ लागतो, मत दिलेल्या उमेदवारांने त्या मताचा गैरवापर केला तर काय करायचे ... तरुणाईला पडलेल्या अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे आज देशपांडे आणि शिनगारे यांनी विद्यार्थ्यांना दिले.
विशेष पुनरीक्षण कार्यक्रम म्हणजे काय, मतदार नोंदणी करणे का आवश्यक आहे,१७ वर्षे पूर्ण झाल्यानंतर आगाऊ मतदार नोंदणी करता येते का अशा अनेक शंकांची उत्तरे यावेळी मान्यवरांनी दिली. महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थी-विद्यार्थींनीनी मतदार नोंदणी जनजागृतीविषयी पथनाट्य सादर केले. महाविद्यालयात उभारलेल्या मतदार नोंदणी केंद्राचे उद्घाटन देशपांडे यांच्या हस्ते झाले.