विरोधी पक्षनेतेपदासाठीच विरोधकांंत चुरस - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 12:24 AM2019-10-12T00:24:34+5:302019-10-12T00:25:21+5:30
राजकीयदृष्ट्या शरद पवार यांची वाईट अवस्था आहे. काँग्रेसने आधीच हार पत्करली आहे.
ठाणे / उल्हासनगर/पेण : या निवडणुकीत चुरस नसल्याने , काँग्रेसने हार मानल्याने आता विरोधी पक्षनेतेपदासाठी चुरस सुरू आहे, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला.
राजकीयदृष्ट्या शरद पवार यांची वाईट अवस्था आहे. काँग्रेसने आधीच हार पत्करली आहे. त्यामुळे द्रष्टेपणाने सुशीलकुमार शिंदे यांनी दोन्ही काँग्रेसच्या विलीनीकरणाचा सल्ला दिल्याची टीकाही त्यांनी ठाण्याच्या सभेत केली. ठाण्यासाठी अंतर्गत मेट्रोला मंजुरी देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
सक्षम वाहतुक व्यवस्था, दळणवळणाच्या सोयी, जलवाहतूक- मेट्रो- मोनो- बस ही वाहतुकीसाठी एक तिकीट, मेट्रोचे जाळे हे मुद्दे त्यांनी मांडले. कल्याण डोंबिवली हायब्रीड मेट्रो उभारणार, ठाणे ते बोरीवली रोप वे यांच्यासह पाच हजार ४०० कोटींच्या मंजूर प्रकल्पांचा उल्लेख त्यांनी केला.
निवडणुकीनंतर पेण-वाशी-खारेपाटाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागून येथील जी प्रलंबित समस्या आहे, त्याचे समाधान खारेपाटातील जनतेला मिळेल, असे आश्वासन फडणवीस यांनी पेणच्या सभेत दिले. एमएमआरडीए अंतर्गत नियमांचे उल्लंघन करून वाशी-खारेपाटासाठी ३८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. पण शेकापसारखे पक्ष त्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतात, हे हास्यास्पद आहे. पेण शहर व संपूर्ण तालुका एमएमआरडीए अंतर्गत आल्याने पेणच्या विकासासाठी एमएमआरडीएचा खजिनाच रिकामा करणार असल्याचे आश्वासनही दिले.
उल्हासनगरात मेट्रो आणून, त्या स्टेशनला सिंधुनगर नाव देण्याचे आश्वासन फडणवीस यांनी तेथील सभेत दिले. शहराचे आधुनिकीकरण करणे, मेट्रो ट्रेन सुरु करणे, सर्व रस्ते सिमेंट काँक्रीटचे करणे व धोकादायक इमारतींना वाढीव ४ चटईक्षेत्र देण्याचे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. पालिकेत भाजपसोबत सत्तेत असलेली ओमी कलानी टीम व त्यांच्या उमेदवारीबाबत मुख्यमंत्र्यांनी मौन बागळले. महायुतीतील रिपाइंची बंडखोरी थांबविण्यात मुख्यमंत्र्यांना यश आले नाही. रिपाइंचे राज्यमंत्री अविनाश महातेकर यांनीही यावेळी बंडखोरीबाबत शब्दही काढला नाही.