मुख्यमंत्र्यांनी नियम शिथिल केले नाही तर मंगळवारी ठाण्यात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:25 AM2021-07-03T04:25:06+5:302021-07-03T04:25:06+5:30
ठाणे : राज्य सरकाने गणेशोत्सवासंदर्भात नियमावली जाहीर केल्यानंतर, प्रशासन व गणपती उत्सव मंडळ हे आमने सामने आले आहेत. ...
ठाणे : राज्य सरकाने गणेशोत्सवासंदर्भात नियमावली जाहीर केल्यानंतर, प्रशासन व गणपती उत्सव मंडळ हे आमने सामने आले आहेत. बाप्पाच्या मूर्तीच्या उंचीच्या निर्बंधांवरून मंडळांमध्ये नाराजी व्यक्त केली आहे. तर प्रशासन मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहे, त्यामुळे येणारे काळात प्रशासन व गणपती मंडळ यांच्यात सामना रंगलेला दिसणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गणेशोत्सवाचे नियम शिथिल केले नाहीत तर तीव्र आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा ठाण्यातील गणेशोत्सव समितीने शुक्रवारी दिला. तसेच येत्या मंगळवारी महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन केले जाईल, असेही स्पष्ट केले आहे.
राज्यात कोरोनाचे सावट आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मंगळवारी गणेशोत्सव नियमावली जाहीर केली आहे. ठाण्यात जवळपास २५० हून जास्त गणपती मंडळ आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्या नियमावलीचा पुनर्विचार करावा, तसेच त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार व्हावा, अशी मागणी ठाणे जिल्हा गणोशोत्सव समन्वय समितीने केली आहे. असे झाले नाही तर मुख्यमंत्र्यांपर्यंत भावना पोहोचवण्यासाठी येत्या मंगळवारी ठाणे महापालिकेसमोर तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा समितीने दिला. यात मूर्तीची उंची, देखावा, धार्मिक कार्यक्रम, आगमन व विसर्जन मिरवणूक यासारख्या मुद्यांबाबत सूचना मांडण्यात आल्या. परंतु, राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सर्व गणेशोत्सव पदाधिकाऱ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, या नियमामध्ये शिथिलता द्यावी, असे ठाणे जिल्हा गणोशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष समीर सावंत यांनी सांगितले. शिथिलता दिली नाही तर महापालिका मुख्यालयासमोर मंगळवारी तीव्र स्वरूपात आंदोलन केले जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
गणेशोत्सव मंडळाच्या भावना आम्ही समजू शकतो. परंतु, कोरोना असून सध्याच्या काळात गर्दी होऊ नये याकडे प्रशासन लक्ष देत आहे. त्यामुळे सरकारची जी नियमावली आहे तीच सगळीकडे लागू असणार आहे. आम्ही ती बदलू शकत नाही. कोरोनाचे संकट आहे, त्यामुळे हा निर्णय घेतला आहे.
(नरेश म्हस्के - महापौर, ठामपा)
राज्य शासनाने गणेशोत्सवाच्या मार्गदर्शक सूचना काढलेल्या आहेत, त्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. कोरोनाचे संकट आहे, त्यामुळे त्याची सावधानता बाळगत गणेशोत्सव साजरा करणे गरजेचे आहे. कोरोना कमी होत असला तरी तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे.
(डॉ. विपीन शर्मा - आयुक्त, ठामपा)