यांनी कितीही रडगाणं गायलं तरी, विधानसभेची हंडी महायुतीच फोडणार; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला
By अजित मांडके | Published: August 27, 2024 03:36 PM2024-08-27T15:36:44+5:302024-08-27T15:56:19+5:30
आनंद दिघे यांनी सुरू केलेला हा सण आता महाराष्ट्र मध्ये देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जात असल्याचेही ते म्हणाले.
ठाणे - विरोधकांनी कतीही आरोप केले, कितीही रडगाणे गायले तरी सुद्धा विधानसभेची हंडी महायुतीच फोडणार असल्याचा दावा मुख्यमंत्री एकणाथ शिंदे यांनी केला. टेंभी नाका मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दिघे साहेबांची दहीहंडी मानाची हंडी याठिकाणी शिंदे यांनी हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी हा दावा केला.
आम्ही लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी आणि आता लाडका गोविंदा आदी सह इतर योजना आणल्या आहेत. मात्र यामुळेच विरोधकांच्या पोटात दुखू लागले आहे. त्यामुळे ते सारखे आरोप करत आहेत, त्यांच्या पाया खालची वाळू घसरली आहे. मात्र त्यांनी कितीही आरोप केले तरी सुद्धा विधानसभेची हंडी महायुतीच फोडणार असल्याचा दावा त्यांनी केला. आमचे सरकार आल्यानंतर सर्व सण, उत्सव हे निर्बंध मुक्त केले. गोविंदा आता प्रो गोविंदा केला, त्यांचा विमा काढला. मात्र प्रत्येक गोविंदाने हा खेळ खेळताना काळजी घ्यावी असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. आनंद दिघे यांनी सुरू केलेला हा सण आता महाराष्ट्र मध्ये देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जात असल्याचेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात जे काही काम केले त्यामुळे भविष्यात पुन्हा एकदा भगवा राज येईल असा विश्वास सिने अभिनेते गोविंदा यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच कोणाला वाटलेही नव्हते की ठाण्यातून मुख्यमंत्री होईल. मात्र एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे आता त्यांनी केलेल्या कामाचा आवाज दिल्लीपर्यंत पोहचत आहे.