वारकऱ्यांना, विठ्ठलभक्तांना टोल माफ; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, त्यांच्या सुरक्षेकडे लक्ष देण्याच्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 05:59 PM2022-07-06T17:59:21+5:302022-07-06T18:59:47+5:30
वारकऱ्यांच्या सोयीसुविधांबाबत बैठक झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
ठाणे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पंढरपूर येथील वारकऱ्यांच्या सोयीसुविधांबाबत आढावा बैठक घेतली. खड्डे लक्षपूर्वक भरा, खड्ड्यांमुळे अपघात होऊन कुणी जखमी होऊ नये, याची प्रामुख्याने दक्षता घ्या, अशी सूचना एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
वारकऱ्यांच्या सोयीसुविधांबाबत बैठक झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूर येथे आषाढीच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचे निर्देश दिले. तसेच अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची पंढरपूर वारी यात्रेसाठी समन्वयक म्हणून नियुक्ती करा, असे निर्देश एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.
कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूर येथे आषाढीच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 6, 2022
वारीच्या पार्श्वभूमीवर सर्व नियोजन झाले आहे. पंढरपूर वारकरी समितीकडून वारकऱ्यांसाठी उत्तर सोय करण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. त्याचप्रमाणे आमच्यापेक्षा वारकऱ्यांच्या सुरक्षिततेकडे जास्त लक्ष द्या, असं एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांना आणि पोलिसांना म्हणाले. मोठा पाऊस झाला तर पाणी साचू नये यासाठी व्यवस्था करा, त्यासाठी पंपाचा वापर करा. आरोग्य सुविधा औषधे, फवारणी तसेच तापाची, साथीच्या आजारांवरील औषधांचा पुरेसा साठा यांची आतापासूनच व्यवस्था करा, अशा सूचना एकनाथ शिंदे यांनी दिल्या.
#आषाढी_एकादशी च्या अनुषंगाने #पंढरपूर येथे वारकऱ्यांच्या सोयी सुविधांचा आढावा घेण्यासाठी आज एक विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत वारीनिमित्त करण्यात आलेल्या सोयी सुविधांचे सादरीकरण करण्यात आले. pic.twitter.com/pudt68OOAH
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 6, 2022
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आषाढीच्या महापूजेचे निमंत्रण
पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आषाढी एकादशीच्या श्री विठ्ठलाच्या महापूजेचे निमंत्रण देण्यात आले. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व समितीचे इतर पदाधिकारी यांनी शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी जाऊन परंपरेप्रमाणे हे आमंत्रण दिले. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी निमंत्रण देतानाच मुख्यमंत्री शिंदे यांचा वारकरी फेटा, उपरणे, वीणा आणि पांडुरंगाची प्रतिमा देऊन सत्कार केला. पंढरपूर प्रांताधिकारी आणि मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यावेळी उपस्थित होते.