आत्मपरीक्षण करण्याऐवजी आरोप करण्यात धन्यता मानणाऱ्यांना शुभेच्छा; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका
By अजित मांडके | Published: January 27, 2023 02:21 PM2023-01-27T14:21:00+5:302023-01-27T14:41:49+5:30
परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमा अंतर्गत किसन नगर येथील शाळेत शिंदे यांनी हजेरी लावली.
ठाणे: आमदार सोडून जातात, खासदार सोडून जातात. राज्यातील नव्हे तर विविध राज्यातील पदाधिकारी सोडून जातात, नातेवाईक सोडून जातात, त्यावर आत्मपरीक्षण करण्याऐवजी आरोप करण्यात धन्यता मानतात अशा नेत्यांना माज्या शुभेच्छा आहेत, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमा अंतर्गत किसन नगर येथील शाळेत शिंदे यांनी हजेरी लावली. यावेळी पत्रकाराशी सवांद साधताना त्यांनी ही टीका केली. मुठबगर लोकांमधून सर्व्हे केल्यावर वस्तुस्थिती समोर येत नाही, माझ्याकडे देशभारतील आकडे आहेत. त्यांनी किती लोकांना भेटून आकडे काढले याची कल्पना नाही, ग्रामपंचायती निवडणुकीमध्ये जे मिळालेलं यश आहे, त्याला मोठा आधार मिळतो, त्यामुळे यश कोणाचे आहे हे जनतेने दाखवून दिले आहे असा समाचार त्यांनी महाविकास आघाडीचा घेतला. मागील अडीच वर्षे प्रकल्प बंद होते. विकास कामे थांबली होती. परंतु आता आमचे सरकार आले आहे आणि आम्ही कामे करून दाखवत आहोत, टीका करणाऱ्यांना टीका करू द्या आम्ही कामातून उत्तर देतो असेही ते म्हणाले.
लोक प्रगती करणाऱ्याला मतदान करतील की काम थांवणाऱ्याला करतील हे जनता ठरवणार आहे, कोणाला मतदान करायचे याबाबत जनता सुज्ञ असल्याचे ही ते म्हणाले. आगामी महापालिका जिल्हापरिषद निवडणूक मिळणारे यश हा मोठा सॅम्पल सर्व्हे असेल, असा दावा देखील त्यांनी यावेळी केला. फक्त आकड्याची बेरीज केली की, २ चे ४ होत नाही, कोणाची आघाडी होईल कोणाची तुटेल हे सांगता येणार नाही, जनता कोणाला प्रतिसाद देईल हे लक्ष्यात येईल. देशात एनडीए सरकार चांगले काम करीत आहे हे तेच म्हणतात मग राज्यात काही वेगळे चित्र आहे का असा सवाल ही त्यांनी केला. त्यांना ओपिनियन पोलचा आनंद घेउद्या, आम्ही त्यांचा आनंद हिरावून घेणार नाही. आगामी काळात सर्वेला उत्तर जनताच देईल असे एकनाथ शिंदे म्हणाले. त्यांच्या टीकेला आरोपाला आम्ही कामांनी उत्तर देतो. लोकांना आरोपात काही इंटरेस्ट नसल्याचेही ते म्हणाले.