'अडीच वर्षापूर्वीच निर्णय घेतले असते तर...'; एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला टोला
By अजित मांडके | Published: July 13, 2022 04:42 PM2022-07-13T16:42:22+5:302022-07-13T16:43:39+5:30
गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यातील आनंद आश्रम येथे आले होते.
ठाणे: शिवसेनेच्या सर्व खासदारांची हीच भुमिका होती की, राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रोपदी मुर्मु यांना पांठीबा देणो. आम्ही देखील त्यांना आधीच पाठींबा दिलेला आहे. एका आदीवासी समाजाला मुख्यप्रवाहात आणण्याचे काम पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. परंतु उध्दव ठाकरे यांनी जी आता भुमिका घेतली आहे, ती भुमिका ही अडीच वर्षापूर्वीच घेतली असती तर आज आमच्यावर ही वेळ आली नसती, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांना लगावला.
गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यातील आनंद आश्रम येथे आले होते. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या तसबीरीला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी हा टोला लगावला. सध्या राज्यात राज्यात जे सरकार आहे, ते स्थिर सरकार असून ते योग्य आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे पक्ष अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेसोबत युती करण्यासंदर्भातील जो प्रस्ताव दिला आहे तो योग्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आम्हाला आता कोणत्याही प्रकारचे राजकारण करायचे नसून राज्याचा सर्वागीन विकास हेच आमचे प्रमुख उद्दीष्ट असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तर मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची झालेली भेट ही सदीच्छा भेट असल्याचेही त्यांनी सांगितले.
गुरुपौर्णिमेनिमत्त बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करुन धर्मवीर आनंद दिंघे यांना देखील वंदन केलेले आहे. या दोघांच्या आर्शिवादाने युतीचे सरकार राज्यात स्थापन झालेले आहे, या दोघांची जी शिकवण होती, ती म्हणोज सर्वसामान्यांना न्याय देण्याची होती. या राज्यातील शेतकरी, कष्टकरी, वारकरी, सर्व समाजातील घटक यांना न्याय देण्याचे काम आमचे सरकार करणार आहे. तसेच राज्याचा सर्वागीन विकास, प्रत्येकाला न्याय देण्याचे काम करण्यासाठी सरकार कटीबध्द असल्याचेही त्यांनी सांगितले.
बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाची भुमिका घेतली, त्याला आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकारी आमच्या भुमिकेला पाठींबा देत असल्याचेही त्यांनी सांगितले. संपूर्ण राज्यभर जी भुमिका घेतलेली आहे, त्याला राज्यातून प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हे सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहे, प्रत्येकाला वाटले पाहिजे हे आपले सरकार आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त बुधवारी आनंद आश्रम येथे उल्हासनगरचे सुमारे १८ नगरसेवक, नाशिक, दिंडोरी आणि नगर येथील शिवसेना नगरसेवकांनी देखील शिंदे यांना समर्थन दिले आहे. किंबहुना त्यांच्या गटात सहभागी झालेले आहेत.