सेनेच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्र्यांनी फोडली हंडी; नेत्यांच्या उत्साहावर विरजण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2018 02:08 AM2018-09-04T02:08:50+5:302018-09-04T02:09:13+5:30
भाजपाबरोबर युती केली नाही तर ठाणे या शिवसेनेच्या गडात घुसून तेथील राजकीय हंडी आपण फोडू, असा इशाराच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिला.
- अजित मांडके
ठाणे : भाजपाबरोबर युती केली नाही तर ठाणे या शिवसेनेच्या गडात घुसून तेथील राजकीय हंडी आपण फोडू, असा इशाराच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिला. सर्वाधिक उंचीचे थर आणि बक्षिसाची बोली लावून भाजपा प्रथमच दहीहंडीच्या खेळात ठाण्यात उतरली. त्यामुळे या खेळावर वर्षानुवर्षे वरचष्मा असलेल्या शिवसेना नेते एकनाथ शिंदे, राजन विचारे, प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक यांच्या दहीहंड्यांकडे दुपारपर्यंत गोविंदा पथकेच काय, बघेदेखील फिरकले नव्हते. तिकडे मनसेच्या अविनाश जाधव यांच्या दहीहंडीच्या व्यासपीठावर राष्ट्रवादीचे आ. जितेंद्र आव्हाड गेले आणि त्यांनी जाधवांत मला जितेंद्रच दिसतो, अशी टिप्पणी करून ठाणेकरांच्या भुवया उंचावल्या.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका वर्ष-दीड वर्षावर येऊन ठेपल्या आहेत. भाजपाला दोन्ही निवडणुका एकत्र हव्या आहेत. भाजपाला शिवसेनेबरोबर युती करायची आहे, तर शिवसेनेला स्वबळाच्या बेटकुळ्या फुगवून दाखवायच्या आहेत. अशा सर्वच राजकीय घडामोडींमध्ये दहीहंडीचा खेळ मोठी भूमिका बजावत आला आहे. दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकांचे कार्यकर्ते हेच राजकारणातील सक्रिय कार्यकर्ते असतात. त्यामुळे मुंबई, ठाण्यात सलामी लावणाºया गोविंदा पथकांना बक्षीस देऊन खूश करण्यामागे राजकीय गणिते आहेत, हे उघड गुपित आहे. ठाण्यातील प्रथमच आयोजित केलेल्या भाजपाच्या दहीहंडीची यंदा तुफान प्रसिद्धी केली गेली. मुख्यमंत्री फडणवीस हे स्वत: काही मंत्र्यांसोबत या हंडीला आवर्जून हजर राहिले. मीडियानेही याच हंडीला प्रसिद्धी दिल्याने शिवसेना नेत्यांच्या हंड्या फिक्या पडल्या. ठाण्यात शिवसेनेचे खा. राजन विचारे, टेंभीनाक्यावरील पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची मानाची हंडी, आमदार प्रताप सरनाईक आणि रवींद्र फाटक यांची हंडी हेच आतापर्यंत गोविंदा पथकांसाठी आकर्षण असायचे. परंतु, यंदा फाटकांची हंडी रस्त्यावरून मैदानात गेली. तेथे सकाळी १० वाजता सुरू होणारा सोहळा दुपारी सुरू झाला. गोविंदा मंडळे आणि गर्दी जमा करण्यासाठी आयोजकांची दमछाक झाली. गर्दी जमा होत नसल्याने जांभळीनाका येथील दहीहंडीच्या ठिकाणी आयोजक खा. राजन विचारे हेही दुपारी उशिराने हजर झाले. सरनाईक यांनी धूर्तपणे सायंकाळी प्रो-दहीहंडीचे आयोजन करून मुख्यमंत्र्यांची पाठ वळल्यावर गर्दी खेचली. टेंभीनाक्यावरसुद्धा काहीसा उत्साह मावळल्याचेच चित्र होते.
मनसेच्या हंडीत आव्हाड
मनसेच्या भगवती विद्यालय येथील दहीहंडी उत्सवात चक्क राष्टÑवादीचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी हजेरी लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. ‘अविनाश जाधव यांच्यात मला जितेंद्र आव्हाड दिसत असल्याचे’, सांगून आव्हाडांनी सर्वांनाच धक्का दिला. मागील २५ वर्षे आपण या खेळाशी निगडित असल्याने आणि अविनाशसुद्धा त्याच दिशेने प्रवास करत असल्याने मी येथे हजेरी लावल्याचे आव्हाडांनी स्पष्ट केले. आव्हाडांनी अलीकडेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती.
भाजपाने उभारलेल्या दहीहंडीकडे गोविंदा पथके व बघ्यांची सकाळी १० वाजल्यापासून गर्दी होती. हिरानंदानी मेडोज हा भाग ओवळा-माजिवडा विधानसभा क्षेत्रात मोडतो. सध्या येथे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचे वर्चस्व आहे. परंतु, त्यांना शह देण्यासाठीच भाजपाने येथे दहीहंडीचे आयोजन करणे भाग पाडले.
पक्षाचे माथाडी कामगारांचे नेते शिवाजी पाटील यांच्यावर ही जबाबदारी टाकण्यात आली होती. शिवसेनेच्या काही आमदारांचे तळ्यातमळ्यात सुरू असल्याची कुजबूज सुरू असताना त्यांच्यावरील भाजपा प्रवेशाकरीता दबाव वाढवण्याची खेळी भाजपा खेळत आहे असा एक राजकीय सूर व्यक्त होत आहे.
त्याचबरोबर पाटील यांच्यासारखे आर्थिकदृष्ट्या तगडे प्रतिस्पर्धी रिंगणात उतरवून शिवसेनेच्या तगड्या उमेदवारांना धुळ चारण्याचे मनसुबेही रचले जात आहेत, अशीही चर्चा आहे. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला स्वबळावर सत्ता मिळाली. जिल्हा परिषदही शिवसेनेने काबीज केली. आता भाजपा आक्रमक झाला आहे.
मागील लोकसभा निवडणूक दोन्ही पक्षांनी युती करून लढवली. विधानसभेत मोदी लाटेचा भाजपाला लाभ झाला. मात्र मागील यश टिकवायचे आणि ठाणे सर करायचे, तर शिवसेनेच्या बलस्थानांवर हल्ला करणे क्रमप्राप्त आहे. त्याच हेतूने भाजपाने मुख्यमंत्र्यांना दहीहंडीला बोलावून हा सोहळा हायजॅक करण्याचा प्रयत्न केला.