कोविड रुग्णालयांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 12:29 AM2020-07-25T00:29:39+5:302020-07-25T00:29:44+5:30
गौरीपाडा येथील स्वॅब टेस्टिंग सेंटरही होणार सुरू
कल्याण : डोंबिवलीतील पाटीदार भवनातील व कल्याण पश्चिमेतील आसरा फाउंडेशन संचालित काळसेकर शाळेतील कोविड रुग्णालय आणि गौरीपाडा येथील स्वॅब टेस्टिंग सेंटरचा आॅनलाइन शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी दुपारी १२.३० वाजता होणार आहे.
कच्छी कडवा पाटीदार समाजाने दावडी येथील पाटीदार भवनाची प्रशस्त जागा महापालिकेस कोविड रुग्णालयासाठी दिली आहे. या भवनातील पहिल्या मजल्यावर पाच हजार चौरस फूट जागेत ७० बेड असून, त्यापैकी ६० बेड आॅक्सिजनयुक्त, तर १० सेमी आयसीयू बेड आहेत. दुसऱ्या मजल्यावर डॉक्टरांसाठी निवास व्यवस्था, कार्यालय राहणार आहे.
तिसºया व चौथ्या मजल्यांवरही प्रत्येकी ७० बेडची सुविधा आहे. बेसमेंटमध्ये कॅन्टीनची सुविधा आहे. सीसीटीव्ही व लिफ्टची सुविधाही पाटीदार समाजाकडून देण्यात आली आहे. रुग्णांसाठी वायफायची सुविधा व मंद आवाजात संगीताची सुविधा आहे. हे रुग्णालय वन रूपी क्लिनिकचे डॉ. प्रशांत घुले यांच्यामार्फत चालविण्यात येणार आहे. तेथे दोन एमडी फिजिशियन, २५ निवासी डॉक्टर, ५० परिचारिका, ३० जणांचा हाउसकिपिंग स्टाफ रुग्णांच्या सेवेसाठी तैनात असेल.
कल्याणच्या काळसेकर शाळेतील प्रशस्त जागेत १०० आॅक्सिजनयुक्त बेड, ८४ साधे बेड, १० सेमी आयसीयू बेड आहेत. तेथे १२ डॉक्टर, २० नर्स, २० वॉर्डबॉय व फिजिशियन तैनात असतील. गौरीपाडा येथील स्वॅब चाचणी केंद्र पीपीपी तत्त्वावर क्रेष्णा डायग्नोस्टीकद्वारे तयार होत आहे. तेथे दररोज तीन हजार चाचण्या करण्यात येणार असल्याने केडीएमसी हद्दीतील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
कोरोना रुग्णांसाठी ठामपाला दिले १० व्हेंटिलेटर्स
ठाणे : सध्या व्हेंटिलेटर्सचा तुटवडा असल्याने रुग्ण दगावण्याची शक्यता आहे. ठिकठिकाणी तशी ओरडही ऐकायला मिळत आहे. ठाण्यातील या संभाव्य समस्येवर वेळीच मात करण्यासाठी कोरोना विशेषज्ञ सेव्हन हिल्स रुग्णालयाचे सहायक वैद्यकीय संचालक डॉ. दिलीप पवार यांनी १० व्हेंटिलेटर्स ठाणे महापालिकेला मोफत दिले आहेत. ठामपा आयुक्त विपिन शर्मा यांच्या दालनात हा कार्यक्रम शुक्रवारी पार पडला. रिपाइं एकतावादीचे युवा नेते भय्यासाहेब इंदिसे यांच्या मध्यस्थीतून डॉ. पवार यांनी हे व्हेंटिलेटर्स मोफत दिले.