मुख्यमंत्र्यांनी भूमिपूजन, लोकार्पण केलेले प्रकल्प केवळ कागदावरच, ठाणेकरांच्या डोळ्यांत धूळफेक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2020 01:28 AM2020-03-01T01:28:46+5:302020-03-01T01:29:02+5:30

मोठा गाजावाजा करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन केलेली क्लस्टर योजना प्रत्यक्षात महिना संपत आला तरी सुरूझालेली नाही,

Chief Minister made land-puja, publication projects on paper only, Thanekar's eyes were dashed | मुख्यमंत्र्यांनी भूमिपूजन, लोकार्पण केलेले प्रकल्प केवळ कागदावरच, ठाणेकरांच्या डोळ्यांत धूळफेक

मुख्यमंत्र्यांनी भूमिपूजन, लोकार्पण केलेले प्रकल्प केवळ कागदावरच, ठाणेकरांच्या डोळ्यांत धूळफेक

Next

ठाणे : मोठा गाजावाजा करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन केलेली क्लस्टर योजना प्रत्यक्षात महिना संपत आला तरी सुरूझालेली नाही, तसेच दिव्यांगांची घरे, स्टॉलच्या वाटपासह बीएसयूपीच्या घरांचे वाटपही अद्याप झालेले नाही. शिवाय, आपला दवाखाना योजनेतून तयार होणारे दवाखाने अद्यापही तयार झालेले नाहीत. त्यामुळे करून दाखवले म्हणत शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी ठाकरे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून ठाणेकरांच्या डोळ्यांत धूळफेक केल्याची टीका आता होऊ लागली आहे.
निवडणुकीपूर्वी ठाणेकरांना दिलेल्या क्लस्टर योजनेच्या आश्वासनाची पूर्तता म्हणून ६ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते किसननगर भागातील काही भागांचे भूमिपूजन केले होते. त्यानंतर, हे काम सुरू होईल, अशी आशा होती. परंतु, ते अद्यापही सुरू झालेले नाही. विशेष म्हणजे येथील रस्ता रुंदीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असली, तरी या योजनेत अद्यापही अडथळे कायम आहेत. याच्या हरकती, सुनावणी अद्यापही झालेली नाही. तसेच येथील बाधितांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन कुठे करणार, याचेही नियोजन केलेले नाही.
दुसरीकडे दिल्लीतील मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवर आपला दवाखाना सुरू केला आहे. शहरात अशा स्वरूपाचे ५० दवाखाने सुरू करण्याच्या निमित्ताने त्याचेही लोकार्पण मुख्यमंत्र्यांनी केले. परंतु, महिना उलटल्यानंतरही घाणेकर नाट्यगृह परिसरातील दवाखान्याचा डेमो काही हललेला नसून शहरात हे दवाखाने सुरूझालेले नाहीत.
बीएसयूपीची घरे, दिव्यांगांची १९० घरे, २६० स्टॉलचे वाटपही प्रातिनिधिक स्वरूपात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले होते. परंतु, आज हे सर्व कागदावरच आहे. दिव्यांगांच्या घरांच्या फायलींवर शुक्रवारी आयुक्तांनी स्वाक्षरी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. ढोकाळी भागातील सायन्स पार्क आणि अर्बन जंगल या प्रकल्पांचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांनी करूनही महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनीच आता या प्रकल्पाला स्थगिती दिली आहे. ही सर्व कामे अर्धवट असताना त्याची घाई कशासाठी, असा सवालही भाजपने केला आहे.


प्रकल्पांच्या भूमिपूजन व लोकार्पणाच्या कार्यक्रमासाठी लाखोंचा निधी खर्च केला आहे. परंतु, आता एक ते दोन आठवड्यांत पुन्हा या योजनांसाठी आणखी एक कार्यक्रम घेण्याचा विचार पालिकेचा असून त्यानंतर प्रत्यक्षात घरांचे चावीवाटप, स्टॉलवाटप केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
> मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण, भूमिपूजन करून त्यांच्या वचनांची पूर्तता शिवसेना करणार नसेल, तर मग याचा अर्थ सत्ताधारी शिवसेना नेत्यांमध्ये समन्वय नसल्याचे दिसते. यामध्ये केवळ ठाणेकरांच्या डोळ्यांत धूळफेक करून त्यांची शिवसेनेने केलेली ही निव्वळ फसवणूक आहे. करदात्या ठाणेकरांच्या पैशांची ही केवळ उधळपट्टी आहे. मुख्यमंत्र्यांनी भूमिपूजन केलेले प्रकल्प त्यांच्याच पक्षाचे नेते रद्द करतात, यापलीकडे आणखी वाईट ते काय. - आ. निरंजन डावखरे,
अध्यक्ष, भाजपा ठाणे शहर जिल्हा

Web Title: Chief Minister made land-puja, publication projects on paper only, Thanekar's eyes were dashed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.