वरसावे उड्डाणपुलाच्या भूमिपूजनासाठी नितीन गडकरींसह मुख्यमंत्री येणार मीरारोडमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2018 06:56 PM2018-01-08T18:56:51+5:302018-01-08T18:57:08+5:30
मीरा-भार्इंदर महापालिका हद्दीतील नवीन वरसावे वाहतूक पुलासह पश्चिम महामार्ग ८ वरील काशिमिरा येथील उड्डाणपुलाखालील जागेचे पालिकेकडे हस्तांतरण, पादचारी पूल, पालिकेच्या नाला बांधकाम व भार्इंदर रेल्वे स्थानक परिसर सुशोभिकरणाच्या भूमिपूजनासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ११ जानेवारीला मीरारोड येथील एस. के. स्टोन मैदानात दुपारी १२ वाजता उपस्थित राहणार आहेत.
- राजू काळे
भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिका हद्दीतील नवीन वरसावे वाहतूक पुलासह पश्चिम महामार्ग ८ वरील काशिमिरा येथील उड्डाणपुलाखालील जागेचे पालिकेकडे हस्तांतरण, पादचारी पूल, पालिकेच्या नाला बांधकाम व भार्इंदर रेल्वे स्थानक परिसर सुशोभिकरणाच्या भूमिपूजनासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ११ जानेवारीला मीरारोड येथील एस. के. स्टोन मैदानात दुपारी १२ वाजता उपस्थित राहणार आहेत.
वरसावे येथील घोडबंदर नदीवर सुमारे १९७३मध्ये मुंबई व गुजरात दरम्यानच्या वाहतुकीसाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत दोन पदरी वाहतूक पूल बांधण्यात आला. त्यानंतर सुमारे २० वर्षांनंतर त्याच्या शेजारी नवीन दोन पदरी उड्डाणपूल बांधण्यात आला. जुना उड्डाणपुलाची दुरुस्ती अवघ्या ३० वर्षांत सतत डोके वर काढू लागल्याने त्या पुलाशेजारी चार पदरी नवीन उड्डाणपूल बांधण्यासाठी केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वी मंजुरी दिली. त्यानुसार पुलाच्या दोन्ही बाजूंकडील जागा संपादनाची प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाल्याने त्याचे भूमिपूजन ११ जानेवारीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. हा उड्डाणपूल राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८ वर बांधण्यात येणार असल्याने त्याच्या मुंबई दिशेकडील दिल्ली दरबार ते फाऊंटन हॉटेल दरम्यान रुंदीकरण प्रस्तावित असून या मार्गावरच्या दुतर्फा असलेल्या दारा ढाबा व लक्ष्मी बाग दरम्यान एक पादचारी पूल बांधण्यात येणार आहे.
महामार्गावरील या विकासकामांच्या भूमिपूजनासह काशिमिरा उड्डाणपुलाखालील जागा पालिकेकडे सुशोभिकरणासाठी याच कार्यक्रमा दरम्यान हस्तांतरीत करण्यात येणार आहे. तसेच पालिकेकडून शहरातील पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी सरकारच्या अमृत योजनेंतर्गत २२ ठिकाणी सुमारे ८.६० किलोमीटर लांबीचे पक्के नाले बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी सुमारे ९४ कोटी ६ लाखांचा निधी खर्ची घालण्यात येणार असून त्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम देखील यावेळी उरकण्यात येणार आहे. याखेरीज भार्इंदर रेल्वे स्थानकाच्या पूर्व व पश्चिम दिशेकडील परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार असून त्यासाठी आमदार निधीतून सुमारे १ कोटींचे अनुदान पालिकेला राज्य सरकारने मंजूर केले आहे. त्याचे भूमिपूजनसुद्धा होणार आहे.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत ११ जानेवारीला सकाळी १२ वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नियोजित वरसावे उड्डाणपुल चार पदरी असून त्यावरुन वसई-विरारकडे जाणारी एकेरी वाहतुकच सुरु करण्यात येणार आहे. तर मुंबईकडे येणारी वाहतुक अस्तित्वात असलेल्या जुन्या दोन वेगवेगळ्या उड्डाणपुलावरुन सुरू करण्यात येणार आहे. हे दोन्ही मार्ग प्रत्येकी दोन पदरी असून त्या पुलांसह नवीन पुलाचा संपुर्ण मार्ग सिग्नल विरहित राहणार आहे. त्यामुळे वाहतुकीचा वेग वाढणार आहे. ठाण्याकडील वाहतुकीला या मार्गावरुन वसई-विरारच्या दिशेने जायचे झाल्यास वाहनांना नवीन पुलाखालुन वळसा घालून पुलाच्या छेदमार्गिकेद्वारे पुलावर जाता येणार आहे. मुंबई ते ठाणे दरम्यानची वाहतूक मात्र पुलाखालून सोडण्यात येणार असून, वसई-विरारहून ठाण्याकडे जाणा-या वाहनांना जुन्या पुलावरून परस्पर निर्गमित करण्यात येणार आहे.