मीरा-भाईंदर शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त; गटबाजीला उधाण येण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 20:00 IST2022-04-20T19:58:09+5:302022-04-20T20:00:02+5:30
मीरा रोड : मीरा-भाईंदर शिवसेनेतील अंतर्गत वादातून शहरप्रमुख व माजी महिला शहर संघटकात झालेल्या राड्याची शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री ...

मीरा-भाईंदर शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त; गटबाजीला उधाण येण्याची शक्यता
मीरा रोड : मीरा-भाईंदर शिवसेनेतील अंतर्गत वादातून शहरप्रमुख व माजी महिला शहर संघटकात झालेल्या राड्याची शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी शहरातील संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करून टाकली आहे; मात्र ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर नियुक्त्या योग्यरीत्या न झाल्यास गटबाजीला उधाण येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भाईंदर पश्चिमेच्या शिवसेना शाखेतील शहरप्रमुख पप्पू भिसे व माजी महिला संघटक वेदाली परळकर यांच्यातील राड्याने शिवसेनेची पुरती नाचक्की झाली आहे. या राड्यामागेही सेनेतील अंतर्गत गटबाजी हे कारण मानले जाते. राड्याच्या त्या घटनेची गंभीर दखल थेट उद्धव ठाकरे यांना घ्यावी लागली आहे. त्यांनी मीरा-भाईंदर शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त केल्याचे शिवसेना भवनमधून जाहीर केले आहे.
महापालिकेची निवडणूक तोंडावर असून, अंतर्गत गटबाजी पाहता कार्यकारिणी बरखास्त करण्याच्या निर्णयाचे निष्ठेने काम करणाऱ्या शिवसैनिकांनी स्वागत केले आहे. नव्याने पदांची नियुक्ती केली जाणार असून, ती पदे गटतट-वशिलेबाजीने न नेमता निष्ठा, संघटनकौशल्य, धडाडी, अभ्यासूपणा व जनमानसातील प्रतिमा पाहून नियुक्त केली जाईल, अशी अपेक्षा ज्येष्ठ शिवसैनिकांनी व्यक्त केली.