"मुख्यमंत्री साहेब तुम्हीच शेवटचा आधार, खाजगी शाळांच्या छळापासून वाचवा"
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 07:54 PM2020-08-31T19:54:18+5:302020-08-31T20:03:17+5:30
मीरा भाईंदरमधील पालकांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साकडे; खाजगी शाळांच्या मनमानी फी वसुलीविरुद्ध पालक उतरले रस्त्यावर
मीरारोड - कोरोना संसर्गा मुळे आधीच आमच्या नोकऱ्या - व्यवसाय बंद असल्याने आर्थिक स्थिती बिकट झाली आहे . शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिकवण्याच्या आड पूर्वी प्रमाणेच शाळा व्यवस्थापना कडून गलेलठ्ठ फी साठी तगादा लावून आमच्या मुलांना व आम्हाला वेठीस धरून छळ केला जात आहे . येथील लोकप्रतिनिधी - अधिकारी यांना सांगून देखील न्याय मिळत नसल्याने आता तुम्हीच शेवटचा आधार आहेत असे साकडे मीरा भाईंदर मधील पालकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घातले आहे .
मीरा भाईंदर मधील विविध मोठ्या खाजगी शाळांच्या पालकांनी आज सोमवरो शाळांच्या बाहेर जमून आपला संताप व्यक्त केला . कोरोना संकटा मुळे आमच्या नोकऱ्या गेल्या , व्यवसाय ठप्प झाला आहे . आमची अक्षरशः होरपळ चालली आहे . या आधी आम्ही या शाळांनी मागितल्या तेवढ्या लाख लाख रुपयांच्या फी भरल्या आहेत . पण आता फी भरणे अशक्य झालेले आहे . शाळांनी तर लेट फी सुद्धा आकारली आहे .
आम्हा पालकांना विविध प्रकारे घाबरवले जातेय . ज्यांनी फी भरली त्यांच्या साठी ऑनलाईन वर्ग सुरु केले . परीक्षा घेतल्या जात आहेत . ज्यांना फी भरता आली नाही त्यांच्या मुलांना ओलनलाईन शिक्षण नाही व परीक्षा देखील नाही . दहावीच्या विद्यार्थ्यांना देखील फी न भरल्याने अभ्यास बंद केला आहे . काही शाळा तर पालकां कडून हमीपत्र लिहून घेत आहेत . काही शाळा तर अजूनही कॅंटीन फी , मिसलेनियस शुल्क अजूनही आकारत आहेत . ज्या पालकांनी फी कमी करा म्हणून शाळांना ईमेल केला त्यांना शाळेच्या वकीला मार्फत नोटिसा बजावण्यात आल्या आहे .
शाळांनी त्यांचा अभ्यासक्रम २५ टक्क्यांनी कमी केला आहे . ऑनलाईन शिकण्यासाठी आमची मुलं घरातूनच अभ्यास करणार व त्यांचा त्यासाठी लागणारा सर्व खर्च देखील पालकच करणार आहेत . शाळा बंद आहेत पण तरी देखील शाळेचे व्यवस्थापन मात्र संपूर्ण वर्षाची आणि पूर्वी प्रमाणेच फी भरण्याचा तगादा लावत आहे .
आम्ही स्थानिक आमदार प्रताप सरनाईक व गीता जैन , महापौर ज्योत्स्ना हसनाळे , शिक्षणअधिकारी उर्मिला पारधी , पालिका आयुक्त व अधिकारी आदीं कडे तक्रारी केल्या , गाऱ्हाणी मांडली . पण कोणी दाद दिली नाही . पारधी यांनी तर तुम्ही आणि तुमची शाळा काय ते बघून घ्या असे सांगून उत्तर दिले .
अश्या बिकट परिस्थिती मध्ये आता मुख्यमंत्री तुमचाच शेवटचा आधार आहे . आम्हाला व आमच्या मुलांना वाचवा . त्यांना शिक्षणा पासून वंचित होऊ देऊ नका असे साकडे या पालकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घातले आहे . शाळांची सरसकट ५० टक्के फी कमी करा . फी भरली नाही म्हणून मुलांचे शिक्षण थांबवू नका अशी विनंती पालकांनी केली आहे .