मुख्यमंत्र्यांच्या घोषणेमुळे उल्हासनगरात वादाची ठिणगी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 04:14 AM2019-10-14T04:14:39+5:302019-10-14T04:14:57+5:30
मेट्रो स्थानकास सिंधूनगर नाव : ‘साई’च्या मागणीने झाला होता वाद
सदानंद नाईक ।
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : उल्हासनगर मेट्रो स्टोशनला सिंधूनगर नाव देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत दिल्याने जुन्या वादाला तोंड फुटले आहे.
मनसे व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सिंधूनगर नावाला विरोध केला आहे. यापूर्वी उल्हासनगरचे सिंधूनगर असे नामांतर करण्यावरून मराठी विरुद्ध सिंधी वाद झाला होता. ऐन निवडणुकीत याच वादाला तोंड फुटल्याचे सेना-मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे असून त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. उल्हासनगरातील प्रचारसभेत मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिले होते. शिवसेनेचे माजी शहरप्रमुख रमेश मुखने यांनी सिंधूनगर नाव देण्याला विरोध केला. यापूर्वी नामांतराचा डाव शिवसेनेने उधळून लावला आहे, असे ते म्हणाले. त्यावेळी शहरात मराठी विरुद्ध सिंधी वाद झाल्याची आठवण मुखने यांनी करून दिली. असा वाद ऐन निवडणुकीच्या काळात होऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
साई पक्षाच्या नगरसेवकांनी गेल्या महिन्यात उल्हासनगरचे सिंधूनगर नामकरण करण्याचा प्रस्ताव आणला होता. मात्र त्याला मनसे, शिवसेना तसेच काही सामाजिक संघटना व इतर पक्षांनी विरोध केल्यावर प्रस्ताव मागे घेतला होता. त्याच मागणीची री मुख्यमंत्र्यांनी ओढल्याची टीका मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी केली. मनसेने मुख्यमंत्र्यांचा निषेध केला. यावेळी सचिन कदम, प्रदीप गोडसे, शालिग्राम सोनावणे, संजग घुगे, मैनुद्दीन शेख आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
उल्हासनगरातील मेट्रो स्टेशनला सिंधूनगर नाव देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री यांनी दिले. मात्र, शहराचे नाव उल्हासनगर हेच राहणार आहे. यापूर्वी सिंधूनगर नावावरून सिंधी विरुद्ध मराठी वाद निर्माण झाला होता. काही लोक ऐन निवडणुकीत विनाकारण तोच वाद निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहेत.
- कुमार आयलानी,
शहराध्यक्ष, भाजप