मुख्यमंत्र्यांच्या अभियानाला हवी साथ; ठाणेकर म्हणून आपला वाटा किती?
By अजित मांडके | Published: December 5, 2022 07:19 AM2022-12-05T07:19:49+5:302022-12-05T07:20:02+5:30
आपण आता मुख्यमंत्री झाल्याने केवळ ठाण्याच्या हिताची काळजी वाहून चालणार नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या हिताची काळजी वाहणार आहोत. त्यामुळे ठाण्याची काळजी ठाणेकरांनी वाहायची आहे.
‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या अभियानाचा प्रारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आला. यावेळी शिंदे यांनी पुढील सहा महिन्यांत ठाण्याचा चेहरामोहरा बदललेला दिसेल, असे आश्वासन ठाणेकरांना दिले. शहरातील रस्ते खड्डेमुक्त करणे, शहर कचरामुक्त करणे, शहराच्या सौंदर्यीकरणात भर घालणे आणि वाहतूककोंडीतून ठाणेकरांची सुटका करणे, या चार गोष्टींना प्राधान्य दिले आहे. यासाठी कोट्यवधींचा निधी राज्य शासनाकडून देण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांची मनोकामना पूर्ण व्हावी, हीच सर्वसामान्य ठाणेकरांची अपेक्षा आहे.
ठाणेकरांना भेडसावणारी कचऱ्याची समस्या ही कायमची सुटायला हवी. रंगरंगोटी करून शहराचा चेहरामोहरा बदलण्यास सुरुवात झाली आहे; परंतु वाहतूककोंडीतून मुक्तता होईल का, हा खरा प्रश्न आहे. ठाणे आता बदलत असून, हे शहर आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील शहर झाल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी उपरोक्त जबाबदारी नवनियुक्त आयुक्त अभिजित बांगर व त्यांच्या सहकाऱ्यांवर सोपवली आहे. नवी मुंबईत असताना बांगर यांनी आपल्या अपेक्षा पूर्ण केल्या असून, त्यामुळेच त्यांना ठाण्यात आणले, त्यामुळे त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवल्याचे शिंदे म्हणाले. मात्र, मुख्यमंत्र्यांचे एक विधान खूप महत्त्वाचे आहे.
आपण आता मुख्यमंत्री झाल्याने केवळ ठाण्याच्या हिताची काळजी वाहून चालणार नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या हिताची काळजी वाहणार आहोत. त्यामुळे ठाण्याची काळजी ठाणेकरांनी वाहायची आहे. जोपर्यंत ठाणेकर सर्व जबाबदाऱ्या लोकप्रतिनिधी व नोकरशहा यांच्यावर सोपवून स्वस्थ बसतील, तोपर्यंत शिंदे यांचे स्वप्न पूर्ण होणे कठीण आहे. शहर कचरामुक्त करायचे तर ठाण्यातील जास्तीत जास्त सोसायट्यांनी कचऱ्याचे वर्गीकरण करून त्यावर प्रक्रिया करून खतनिर्मिती केली पाहिजे. ठाणे शहरात यापूर्वीच्या आयुक्तांनीही सौंदर्यीकरणावर भर दिला. भिंती रंगवल्या व चौकांची सजावट केली. मात्र, ठाणेकरांमधील काहींना भिंत दिसताच पिचकाऱ्या मारण्याची खोड आहे. घरातील कचरा रस्त्यावर आणून टाकण्याची सवय जडलेली आहे. या सवयी ठाणेकरांना सोडाव्या लागतील.
शिवाय जर कुणी शहराच्या सौंदर्यीकरणाला बाधा आणत असेल तर त्याचे कान धरले पाहिजेत. नाहीतर महापालिकेने रंगरंगोटी करायची व ठाणेकरांनी शहर विद्रुपीकरणाकडे डोळेझाक करायची हेच वर्षानुवर्षे सुरू राहील. केवळ एका व्यक्तीसाठी मोटार घेऊन घराबाहेर पडणे ठाणेकरांनी टाळले पाहिजे. एकाच कॉम्प्लेक्समधील चार-पाच जण थोड्याशा अंतराने मुंबईकडे आपापली वाहने घेऊन जात असतील तर त्यांनी थोडीशी तडजोड करून कारपुलिंग केला व दररोज पाच जणांपैकी एकाच्याच मोटारीतून मुंबई गाठायची पद्धत सुरू केली तरी कोंडी कमी होईल.
कोथिंबिरीची जुडी आणायला गाडी
अनेक ठाणेकर जिममध्ये जाऊन पोट कमी करण्याकरिता ट्रेडमिलवर चालतात; पण कोथिंबिरीची जुडी आणायला मोटार घेऊन बाहेर पडतात.ठाणेकरांनी जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतूक वापरली तर वाहतूक कोंडी सुटेल.