खड्ड्यांवरुन अधिकाऱ्यांची कानउघाडणी, मुख्यमंत्र्यांची ठाणे जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 03:48 PM2022-07-06T15:48:08+5:302022-07-06T15:49:32+5:30
सरकारी यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सुरू
ठाणे : घोडबंदर रोड वरील काजूपाडा या ठिकाणी खड्ड्याच्या पहिला बळी गेल्यानंतर या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारी यंत्रणा आणि पालिका अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे. संभाव्य आपत्ती संदर्भात सतर्क राहण्याचा सूचना देण्याबरोबरच त्वरित खड्डे भरण्याचे आदेशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. दरम्यान, मुंबईसह, ठाण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावरील खड्डे उघडे पडले असून नवीन शिंदें सरकारला विचारणा होत आहे.
राज्यात ठाण्याचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने साहजिकच ठाणेकरांच्या आशा-अपेक्षा वाढल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांची ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात महत्वाची बैठक सुरू असून या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सर्व सरकारी यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील सहा महापालिकांसोबतच कोकण पट्ट्यातील सर्व यंत्रणांचे अधिकारी या बैठकीसाठी ऑनलाईन उपस्थित आहे. मुंबई तसेच ठाणे परिसरात पावसाचा जोर कायम असून संभाव्य आपत्तीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्र्यांची ही बैठक सुरू आहे.