मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे पुन्हा ‘सुखरूप’ लँडिंग! पायलटचे प्रसंगावधान, थोडक्यात दुर्घटना टळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 06:21 AM2018-01-12T06:21:34+5:302018-01-12T06:21:45+5:30
पायलटने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरचे गुरूवारी पाचव्यांदा ‘सुखरुप’ लँडिंग झाले. मीरा-रोडमध्ये घडलेल्या घटनेने मुख्यमंत्र्यांचा हवाईदौरा कधी निर्धोक होणार, असा प्रश्न निर्माण झाला असून हेलिकॉप्टर दौºयाच्या सुरक्षेची फेरसमिक्षा करण्याची वेळ आली आहे.
मीरा रोड : पायलटने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरचे गुरूवारी पाचव्यांदा ‘सुखरुप’ लँडिंग झाले. मीरा-रोडमध्ये घडलेल्या घटनेने मुख्यमंत्र्यांचा हवाईदौरा कधी निर्धोक होणार, असा प्रश्न निर्माण झाला असून हेलिकॉप्टर दौºयाच्या सुरक्षेची फेरसमिक्षा करण्याची वेळ आली आहे.
घडले ते असे- वरसावे खाडीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने उभारण्यात येणाºया नवीन पूल व अन्य विकासकामांच्या भूमिपूजनासाठी मुंबईहून हेलिकॉप्टरने मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे मीरा रोडला आले होते. त्यासाठी सेव्हन स्क्वेअर अॅकॅडमी शाळेलगतच्या मैदानावर हेलिपॅड उभारण्यात आले होते. मात्र, जवळच्या इमारतींवरील केबल्स तशाच होत्या. हेलिकॉप्टर खाली उतरवत असताना पायलटच्या ही बाब लक्षात आल्यामुळे त्याने अत्यंत सावधानता बाळगत लँडिंग केल्याने मोठी दुर्घटना टळली.
गेल्या वर्षभरातील ही अशाप्रकारची सहावी घटना आहे.
हेलिकॉप्टरमध्ये पुन्हा गर्दी!
फडणवीस व गडकरी यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील अन्य दोन-तीन मंत्री मुंबईला याच हेलिकॉप्टरमधून परतणार होते. मात्र एवढे ‘ओझे’ पेलवणार नाही, असे पायलटने बजावल्याने मग सगळ्यांनी रस्ता धरला.
दोन दिवसांपूर्वी दिला होता इशारा
हेलिपॅड उभारण्यापूर्वी पोलीस, जिल्हा प्रशासन व भाजपा पदाधिकारी यांनी संबंधित ठिकाणाची पाहणी केली, तेव्हा इमारतीवरून इंटरनेट केबल गेल्याचे निदर्शनास आले होते. त्या तातडीने हटवण्याची सूचना केली होती, असे भाजपा पदाधिकाºयांचे म्हणणे आहे.
प्रशासनाकडून सारवासारव!
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला सातत्याने ‘अडथळ’ येत असताना जिल्हा प्रशासनाकडून मात्र प्रत्येकवेळी सारवासारव केली जाते. मीरा रोडमध्येही त्याचा प्रत्यय आला. आजच्या घटनेला प्रत्यक्षदर्शी व पोलिसांनी दुजोरा दिलेला असताना जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी याचा इन्कार केला आहे.