डावखरेंना फोडल्यानं वाढली भाजपाचीच चिंता; शिवसेना देऊ शकते धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 02:25 AM2018-05-24T02:25:57+5:302018-05-24T02:25:57+5:30

कोकण पदवीधर मतदारसंघात पुढील महिन्यात होणारी निवडणूक रंगतदार बनली आहे.

Chief Minister's reputation is in 'Graduate' | डावखरेंना फोडल्यानं वाढली भाजपाचीच चिंता; शिवसेना देऊ शकते धक्का

डावखरेंना फोडल्यानं वाढली भाजपाचीच चिंता; शिवसेना देऊ शकते धक्का

Next

ठाणे : स्थापनेपासून भाजपाचे वर्चस्व असलेल्या आणि गेल्यावेळी शिवेसनेने राष्ट्रवादी काँग्रेसला मदत केल्याने हातातून निसटलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघात पुढील महिन्यात होणारी निवडणूक रंगतदार बनली आहे. त्या मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निरंजन डावखरे यांना फोडून उमेदवारी देण्याच्या तयारीतील भाजपाला धक्का देण्यासाठी शिवसेनेने रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपाच्या नाराज नेत्याला गळाला लावल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही शेतकरी कामगार पक्षाला हाताशी धरून जोरदार लढत देण्याची व्यूहरचना केली असून त्यांना काँग्रेस, बहुजन विकास आघाडीची साथ मिळाल्यास आतापर्यंत दुरंगी वाटणारी ही निवडणूक तिरंगी होईल आणि त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच प्रतिष्ठा पणाला लागण्याची शक्यता आहे.
या मतदारसंघातील २०१२ च्या निवडणुकीत निरंजन डावखरे यांना २७ हजार ६३३ मते मिळाली होती, तर भाजपाचे उमेदवार संजय केळकर यांना २२ हजार ९२ मते मिळाली होती. डावखरे यांच्या भाजपाप्रवेशाने यंदाच्या ९० हजार मतांतील ४९ हजार ७०० मतांची बेगमी झाल्याचा भाजपा नेत्यांचा दावा आहे. मात्र कुठल्याही निवडणुकीत अन्य पक्षातून येणारा उमेदवार आपली सर्व मते घेऊन येत नाही. डावखरे यांना पडलेली बहुतांश मते ही राष्ट्रवादी काँग्रेसची आहेत.
ठाण्याच्या महापौरपदाच्या निवडणुकीतील वादातून गेल्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपाला मदत केली नव्हती. उलट वसंत डावखरे यांचे शिवसेनेसोबतचे संबंध कामी आले होते. यंदा मात्र शिवसेनेने ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांना रिंगणात उतरविण्याची तयारी करून त्यांना रायगड जिल्ह्याचे संपर्कमंत्रीपद दिले होते. ठाणे-पालघरमधील शिवसेनेचे काम, रायगडमध्ये खुद्द मोरे यांनी केलेले काम यांचा पक्षाला फायदा होईल, असे शिवसेनेचे गणित आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गातही शिवसेनेचे काम आहे. पण तेथील मतदारांची संख्या कमी असल्याने आणि त्यात भाजपाच्या पारंपरिक मतांचे प्रमाण अधिक असल्याने चार जिल्ह्यांवरच शिवसेनेची भिस्त आहे. त्यामुळे त्या जिल्ह्यात भाजपाला धक्का देण्याची शिवसेनेची तयारी आहे. तसे झाल्यास संजय मोरे यांच्याऐवजी भाजपातून शिवसेनेत येणाऱ्या नेत्याला उमेदवारी देत भाजपाच्या पारंपरिक मतांत फाटाफूट घडवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. पण त्यासाठी आमदारकीच्या तयारीने गेले काही दिवस काम करणाºया मोरे यांची नाराजी सोसावी लागेल.
निरंजन डावखरे पक्ष सोडतील, याची कुणकुण पक्षाच्या नेत्यांना होती. त्यांनी पक्षाच्या व्यासपीठावर जाणेही गेल्या काही दिवसांत टाळले होते. वसंत डावखरे हयात असताना त्यांच्या सर्वपक्षीय राजकीय संबंधांवर निरंजन यांचे राजकारण अवलंबून होते. त्यांचा सवार्धिक वावार शहरी मतदारांपुरताच मर्यादित होता. मात्र गेल्या वर्ष-दीड वर्षांत ते पाचही जिल्ह्यांत फिरले. त्यांचे नाव मतदारांना ओळखीचे असल्याचा आणि नेमस्त स्वभावाचा फायदा उठवता येईल, असा भाजपा नेत्यांचा होरा आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने खजिनदार हेमंत टकले यांच्या कन्या व शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्या स्नुषा चित्रलेखा नृपाल पाटील यांना या मतदारसंघातून उमेदवारी देण्याबाबत गांभीर्याने चर्चा सुरू आहे. त्यांना उमेदवारी दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेस-शेकाप एकत्र असतीलच; शिवाय त्यांना काँग्रेस आणि हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचाही पाठिंबा मिळेल, असे गणित आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणे निरंजन डावखरे यांना पाठिंबा देतील, असे मानले जाते. पण राष्ट्रवादी, शेकाप, बहुजन विकास आघाडी यांनी गळ गातली तर मात्र त्यांना ‘स्वाभिमान’ कायम ठेवत निर्णय घ्यावा लागेल. तो भाजपा श्रेष्ठींच्या कितपत पचनी पडेल, ते सांगता येत नाही.
या मतदारसंघात यापूर्वी वरचष्मा असलेले संजय केळकर आणि यंदा उमेदवारीसाठी उत्सुक असलेले विनय नातू, शहराध्यक्ष संदीप लेले हे नेते निरंजन यांच्या भाजपा प्रवेशाबद्दल फारसे समाधानी नसल्याची चर्चाही पक्षात आहे. त्यामुळे डावखरे यांचा गुरूवारी भाजपा प्रवेश झाला, की अन्य पक्षांतील घडामोडीही सुरू होतील. पण शिवसेनेसह अन्य पक्ष आपापली ताकद पणाला लावून उतरले तर या तिरंगी लढतीत निरंजन यांच्या विजयासाठी भाजपाच्या अन्य नेत्यांपेक्षा मुख्यमंत्र्यांचीच प्रतिष्ठा पणाला लागण्याची शक्यता आहे.

Web Title: Chief Minister's reputation is in 'Graduate'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.