ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष कार्यान्वित
By सुरेश लोखंडे | Published: December 26, 2022 06:16 PM2022-12-26T18:16:45+5:302022-12-26T18:18:01+5:30
राज्याच्या मुख्य सचिवांनी नव्याने निर्देश निर्गमीत केले आहेत. प्रशासनात अधिकाधिक व प्रभावीपणे लोकाभिमुखता, पारदर्शकता व गतिमानता आणण्यासाठी सचिवाल कक्ष सुरू करून विशेष प्रयत्न केले जात आहेत.
ठाणे : सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासन स्तरावर असलेली कामे, प्राप्त होणारे अर्ज, निवेदने इत्यादीवर वेळेत कारवाई करुन
लोकाभिमुख, पारदर्शकता व प्रशासन गतिमान करण्यासाठी आता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे क्षेत्रीय कार्यालय आजपासून स्थापन करण्यात आले आहे.
राज्याच्या मुख्य सचिवांनी नव्याने निर्देश निर्गमीत केले आहेत. प्रशासनात अधिकाधिक व प्रभावीपणे लोकाभिमुखता, पारदर्शकता व गतिमानता आणण्यासाठी सचिवाल कक्ष सुरू करून विशेष प्रयत्न केले जात आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवून परिणामकारक निपटारा होण्यासाठी हे मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे क्षेत्रीय कार्यालय स्थापन करण्यात आले आहे.जिल्ह्यातील उपलब्ध अधिकारी, कर्मचारी यांच्यामधून आवश्यक अधिकारी, कर्मचारी यांच्या सेवा या मुख्यमंत्री सचिवालय कक्षासाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी हे या कक्षाचे पदसिध्द विशेष कार्य अधिकारी आहेत. त्याशिवाय एक नायब तहसिलदार व एक अव्वल कारकून व एक लिपिक टंकलेखक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ठाणे जिल्हा शहरी आणि ग्रामीण, दुर्गम, डोंगरी अशा भागात विभागला आहे. ठाणे जिल्ह्यातील सात तालुक्यांमधील नागरिकांचे शेती, नागरी, विकास कामांच्या समस्यासंदर्भातील प्रश्न, तक्रारींचा निपटारा झटपट होण्यासाठी या कक्षामुळे मदत होणार आहे. जिल्ह्यातील ग्रामीण व डोंगरी भागातील नागरिक हे पहाटे निघून मंत्रालयात कामासाठी जात असतात. अशा नागरिकांचे प्रश्न गतिमानतेने, पारदर्शकपणे व विनाविलंब जिल्हास्तरावरच मार्गी लागावे, यासाठी ठाणे जिल्ह्यात क्षेत्रिय कार्यलय सुरू करण्यात आले आहे. जिल्हास्तरावरुन कार्यवाही होणे अपेक्षित असलेल्या अर्ज व निवेदन अशी प्रकरणे जिल्हा स्तरावरील संबंधित विभाग प्रमुखाकडे वर्ग करुन त्यावर तातडीने कार्यवाही शासन स्तरावरील निर्देशान्वये करण्याच्या सुचना संबंधीत कक्षास जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या नावे प्राप्त होणारे अर्ज, निवदने व संदर्भ स्विकारले जाणार आहेत. प्राप्त अर्जांची पोचपावती संबंधितांना देऊन हे अर्ज पुढील कार्यवाहीसाठी क्षेत्रिय कार्यालयाकडे पाठविण्यात येतील. यावर केलेल्या कार्यवाहीचा मासिक आढावाही शासनाला सादर करण्यात येईल., असे या कक्षाचे विशेष कार्य अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांनी सांगितले.