मुख्यमंत्र्यांचे ‘स्मार्ट’ घूमजाव
By admin | Published: December 17, 2015 01:55 AM2015-12-17T01:55:18+5:302015-12-17T01:55:18+5:30
महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारावेळी आणि आधी झालेल्या भाजपच्या विकास परिषदेत कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांना मी ६,५०० कोटींच्या पॅकेजबद्दल कोणतेही
कल्याण : महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारावेळी आणि आधी झालेल्या भाजपच्या विकास परिषदेत कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांना मी ६,५०० कोटींच्या पॅकेजबद्दल कोणतेही आश्वासन दिले नव्हते, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषेदत घेतली. त्यामुळे मते मागण्यापुरती ही घोषणा करून मुख्यमंत्र्यांनी घूमजाव केल्याची आणि कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांची फसवणूक केल्याची टीका काँग्रेसचे आमदार संजय दत्त यांनी केली आहे.
पालिकेतून वगळलेल्या, पुन्हा पालिकेत समाविष्ट केलेल्या आणि निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा वगळलेल्या २७ गावांबाबतही मुख्यमंत्र्यांनी मौन बाळगल्याची टीकाही दत्त यांनी केली. ही गावे पालिकेतच ठेवणार की वगळणार याबाबत दत्त यांनी स्पष्टीकरण मागितले होते. पण ते मुख्यमंत्र्यांनी न दिल्याने २७ गावांतील नागरिकांचीही फसवणूक झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
या संदर्भात दत्त यांनीच प्रश्न उपस्थित केला होता आणि पालिका निवडणुकीत आश्वासन दिलेले पॅकेज कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांना कधी मिळणार, असे विचारले होते. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी पॅकेजबाबत घूमजाव केल्याबद्दल आणि कानावर हात ठेवल्याबद्दल सडकून टीका करणारे ट््िवट दत्त यांनी केले. कल्याण-डोंबिवली पालिकेच्या निवडणुकीचा प्रचार रंगात आला असताना भाजपने घेतलेल्या विकास परिषदेत मुख्यमंत्र्यांनी कल्याण-डोंबिवलीला स्मार्ट सिटीचा दर्जा दिल्याचे जाहीर करतानाच त्यासाठी ६,५०० कोटींचे पॅकेज देण्याची घोषणा केली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांविरोेधात आचारसंहिता भंगाची तक्रारही करण्यात आली. त्यावर आयोगाने पाठविलेल्या नोटीशीला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी स्मार्ट सिटीच्या नियोजनातच कल्याण-डोंबिवलीला पॅकेज देण्याचा तपशील असल्याचे सांगत मी केवळ त्याचा पुनरूच्चार केला, असा पवित्रा घेतला होता. भाजपने हाच मुद्दा उचलून धरत स्मार्ट सिटी आणि पॅकेज याच मुद्दयांवर प्रचारात भर दिला होता.
राज ठाकरे यांची झोड
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या पॅकेजवर टीकेची झोड उठवत हे पैसे येणार कुठून, असा प्रश्न जाहीररित्या विचारला होता आणि ‘भाजपा म्हणजे थापा’ अशा शब्दांत त्या योजनेची खिल्ली उडवली होती.
पण कल्याण-डोंबिवली ही शहरे स्मार्ट होणार आणि त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. वेगवेगळ््या मार्गाने येणाऱ्या गुंतवणुकीतून कल्याण-डोंबिवलीला ६,५०० कोटी रूपये दिले जातील, असा विश्वासही फडणवीस यांच्यासह
भाजपच्या नेत्यांनी नंतरच्या सभांतून दिला होता.
आम्हाला निवडून दिले,
तर २७ गावे वगळण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले होते. पण सध्या
गावे वगळण्याचा प्रश्न न्यायालयात आहे.