मेहतांवर मुख्यमंत्र्यांचा वॉच
By admin | Published: July 17, 2017 01:10 AM2017-07-17T01:10:42+5:302017-07-17T01:10:42+5:30
मीरा-भार्इंदर महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच सत्ताधारी भाजपामधील इच्छुकांमध्ये चुरस वाढून राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
धीरज परब ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच सत्ताधारी भाजपामधील इच्छुकांमध्ये चुरस वाढून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या वॉर रूममधील टीम शहरात तैनात केली असून त्यांचेदेखील प्रभागानुसार सर्वेक्षण सुरू आहे. त्यामुळे निवडणुकीची सर्व सूत्रे हाती ठेवण्याच्या आमदार नरेंद्र मेहता यांच्या मनसुब्यांना थेट मुख्यमंत्र्यांनीच धक्का दिल्याचे मानले जात आहे.
मीरा-भार्इंदरमध्ये शिवसेना, बविआच्या मदतीने भाजपाची सत्ता आहे. पण, दोन्ही काँग्रेसमध्ये मोठी फूट पडून भाजपा व शिवसेनेत मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाले आहे. त्यातच भाजपात इच्छुकांची असलेली मोठी संख्या, विद्यमान नगरसेवकांचे पत्ते कापले जाण्याची शक्यता, अनेकांना दिलेल्या आश्वासनांची न होणारी पूर्तता हे सर्व पाहता भाजपात बंडाळीची चिन्हे आहेत. आचारसंहिता लागू होण्याआधीच भाजपाच्या दीप्ती भट, सुमन कोठारी, सुजाता शिंदे या तीन नगरसेविकांसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
आचारसंहिता लागू झाल्यानंतर आता १८ व १९ जुलैला पक्षांचे अर्ज इच्छुकांकडून भरून घेतले जाणार आहेत. त्यासाठी तीन हजार शुल्क आकारले जाणार आहे. आलेल्या अर्जांची छाननी करून त्यानंतर २१, २२ जुलैला अर्ज भरलेल्या इच्छुकांच्या मुलाखती पक्षाचे प्रभारी खासदार कपिल पाटील व राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह स्थानिक कोअर कमिटी घेईल. मुलाखतीनंतर आपला अहवाल तयार करून प्रदेशला पाठवला जाणार आहे.
पक्षाचे उमेदवारी अर्ज भरल्यानंतर मुलाखती घेतल्या जाणार असल्याचा केवळ सोपस्कार असून उमेदवारी कुणाला द्यायची, हे स्थानिक नेतृत्वाने जवळपास निश्चित केलेले आहे. त्यातही काही प्रभागांमध्ये विद्यमान नगरसेवक तसेच इच्छुकांची संख्या मोठी असल्याने उमेदवारी देण्यावरून मोठा पेच निर्माण झाला आहे. बंडाळीची भीती असल्याने उमेदवार जाहीर न करता अर्ज भरायच्या शेवटच्या दिवसापर्यंत इच्छुकांना थोपवून धरण्याची रणनीती आखण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यामुळे इच्छुकांमधील धाकधूक वाढली असून अनेकांनी आपला व्यक्तिगत प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. काही प्रभागांमध्ये उमेदवारीवरून वाद नसल्याने त्या ठिकाणी मात्र इच्छुकांनी मिळून प्रचारही सुरू केला आहे.
दरम्यान, स्थानिक भाजपा नेतृत्वाने प्रभागानुसार केलेल्या सर्वेक्षणानुसार ६० जागांवर विजय मिळण्याचा अंदाज असला तरी ७० जागा निवडून आणायचे लक्ष्य ठरवले असल्याचे भाजपाच्या सूत्रांनी सांगितले. शिवाय, प्रभारी यांनीदेखील प्रभागानुसार सर्वेक्षण हाती घेतले आहे. महत्त्वाचे म्हणजे थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वॉररूममधील टीम मीरा-भार्इंदरमध्ये सक्रिय असून त्यांनीही सर्वेक्षण चालवले आहे.
यामुळे स्थानिक नेतृत्वाकडून केवळ स्वत:च्या मर्जीतल्या उमेदवारांना उमेदवारी देण्याचा घातला जाणारा घाट आता थेट मुख्यमंत्र्यांच्या सर्वेक्षणामुळे बारगळणार आहे. मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीवर लक्ष केंद्रित करून सर्वेक्षण हाती घेतल्याने याचा मेहता समर्थकांना फटका बसण्याची चिन्हे आहेत.
एकीकडे मुख्यमंत्र्यांनी पालिका निवडणुकीत लक्ष घातल्याने मेहतांना काहीसा लगाम त्यांनी घातल्याचे त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांकडून सांगितले जात असले, तरी राजकीय डावपेच व वरिष्ठांचे मन वळवण्यात तरबेज मानले जाणारे मेहता स्वत:ची तिकीटवाटपावरील पकड सहज सोडतील, असे जाणकारांना वाटत नाही.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातल्याने पक्षातील मेहता विरोधकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असल्याचे समजते.