चिखलोली धरण पुन्हा प्रदूषणाच्या विळख्यात?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 02:51 AM2018-09-28T02:51:24+5:302018-09-28T02:51:49+5:30
गेल्यावर्षी मे महिन्यात चिखलोली धरणातील पाणीसाठ्यात रसायनांचे अंश आढळल्याने या धरणातील पाणीपुरवठा बंद केला होता. या प्रकरणाची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याचे आदेशही मंत्र्यांनी दिले होते.
अंबरनाथ - गेल्यावर्षी मे महिन्यात चिखलोली धरणातील पाणीसाठ्यात रसायनांचे अंश आढळल्याने या धरणातील पाणीपुरवठा बंद केला होता. या प्रकरणाची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याचे आदेशही मंत्र्यांनी दिले होते. मात्र ना चौकशी ना कंपन्यांवर कारवाई झाली. त्यामुळे पुन्हा या धरणातील पाण्याला कारखान्यांचा धोका निर्माण झाला आहे.
अंबरनाथ नगरपालिकेच्या हद्दतील चिखलोली धरणातून नियमित शहरातील पूर्व भागात सहा दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र या धरणाच्या सीमेवर अनेक रासायनिक कारखाने उभारण्याची परवानगी एमआयडीसीने दिल्याने या कारखान्यांचा धोका थेट धरणाला झाला आहे. या कारखान्यातील रासायनिक द्रव्य थेट धरणपात्रात जात असल्याने धरणातील पाणी दूषित होत आहे. गेल्यावर्षी हा प्रकार उजेडात आला होता. कारण दरवर्षीपेक्षा जास्त रसायन या पाण्यात आढळले होते. या धरणातील सर्व पाणी दूषित आणि घातक झाल्याने या धरणातून पाणी उचलण्यास बंदी घातली होती. तब्बल महिनाभर अंबरनाथ पूर्व भागाला या धरणातून पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. धरणात थेट कंपनीतील रसायन येत असल्याने कंपन्यांवर कारवाईची मागणी सातत्याने केली जात होती. मात्र या कंपन्यांवर कारवाई झालेली नाही. २१ मे रोजी पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी या धरणाची पाहणी केली होती. धरणाच्या पाण्यात रसायनमिश्रीत पाणी असल्याचे समोर आल्यावर त्यांनी संबंधित कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र महिना उलटल्यावरही त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. मंत्र्यांचेच आदेश धाब्यावर बसविण्याचे काम प्रदूषण नियंत्रण मंडळाने केले होते. काहीतरी कारवाई दाखविण्याच्या प्रयत्नात प्रदूषण नियंत्रण मंडळ हे कारखान्यांना संरक्षण देण्याचा प्रयत्न करीत राहिले. सरकारी यंत्रणेच्या या कामचुकारपणाचा फटका हा चिखलोली धरणाला आणि त्यातील पाण्याला बसत आहे.
पावसाळा संपत आल्याने आता पुन्हा या धरणातून अंबरनाथ शहराला नियमित पाणीपुरवठा केला जाणार आहे. या धरणातील पाणी दूषित होणार नाही याची दक्षता घेण्याची गरज आहे. त्या अनुषंगाने जीवन प्राधिकरणाचे अधिकारीही प्रयत्न करीत आहेत. मात्र ज्या कंपन्यांनी गेल्यावर्षी धरणातील पाणी दूषित केले होते त्यांच्यावर कोणतीच ठोस कारवाई न झाल्याने हे कंपनी व्यवस्थापन निर्धास्त झाले आहेत.
चिखलोली धरणातील पाणी प्रदूषित करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई होत नसल्याने या प्रकरणी मनसेचे जिल्हा संघटक संदीप लकडे यांनी पुढाकार घेतला आहे. धरणातील पाणी दूषित करणारे कारखाने बंद करण्याची मागणी त्यांनी केली आहे. अंबरनाथ शहरातील पूर्वेकडील शिवाजीनगर, महालक्ष्मीनगर, कैलासनगर, वडवलीचा काही भाग असा सुमारे पन्नास हजार लोकवस्तीला या धरणातून पाणीपुरवठा होतो.
मनसेचा आंदोलनाचा इशारा
ही बाब लक्षात घेऊन लघु पाटबंधºयाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी पंधरा दिवसात संबंधित कंपन्यांवर चौकशी करून दोषींवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी लकडे यांनी केली आहे. कारवाई न केल्यास मनसे स्टाईल तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.