चिखलोली रेल्वेस्थानकाला अखेर मिळाला मुहूर्त; दोन वर्षांत स्थानक होणार पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 12:56 AM2020-08-27T00:56:17+5:302020-08-27T00:56:26+5:30
८ सप्टेंबरपासून होणार जमीनमोजणी, मुंबईतील घरांच्या वाढत्या किमतींमुळे सामान्यांना घरे घेणे शक्य होत नाही. त्यात मुंबईला लागूनच असलेल्या ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागाचे झपाट्याने नागरिकीकरण होत आहे.
ठाणे : मध्य रेल्वेमार्गावरील प्रस्तावित चिखलोली रेल्वेस्थानकाच्या उभारणीसाठी सुमारे साडेआठ एकर जमिनीच्या भूसंपादन प्रक्रियेला मुहूर्त मिळाला असून या जागेची मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन आणि जिल्हा प्रशासन संयुक्तपणे ८ सप्टेंबरपासून मोजणी करणार आहेत. या कामासाठी जिल्हा प्रशासनानेजमीनमालकांना नोटिसाही पाठवल्या आहेत. तसेच येत्या दोन वर्षांत हे स्थानक उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
मुंबईतील घरांच्या वाढत्या किमतींमुळे सामान्यांना घरे घेणे शक्य होत नाही. त्यात मुंबईला लागूनच असलेल्या ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागाचे झपाट्याने नागरिकीकरण होत आहे. त्यात बदलापूर आणि अंबरनाथ या शहरांकडे सर्वसामान्य नागरिकांचा ओढा वाढत आहे. मध्य रेल्वेच्या अंबरनाथ रेल्वेस्थानकापासून बदलापूर रेल्वेस्थानक सुमारे सहा ते सात किलोमीटर अंतरावर आहेत. या दोन्ही रेल्वेस्थानकांदरम्यान असलेल्या आजूबाजूच्या छोट्या गावांचेही मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण झाले आहे. त्यामुळे या दोन स्थानकांच्या मध्ये असलेल्या गावांमधील नागरिकांना उपगनगरीय लोकल पकडण्यासाठी अंबरनाथ किंवा बदलापूर रेल्वेस्थानकात यावे लागते.
त्यामुळे सकाळी-संध्याकाळी रेल्वेस्थानकांमध्ये प्रचंड गर्दी असते. ती कमी करण्यासाठी अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वेस्थानकांच्या दरम्यान असलेल्या चिखलोली परिसरात नवे रेल्वेस्थानक उभारण्यात यावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून रेल्वे प्रवासी संघटनांकडून करण्यात येत होती. मध्य रेल्वे प्रशासनाने चिखलोली रेल्वेस्थानक उभारण्यासाठी मागील वर्षी मंजुरी दिली होती. ते उभारण्याचे काम मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनला देण्यात आले. या कॉर्पोरेशनच्या संकल्पनेनुसार यासाठी सुमारे साडेआठ एकर जागेची आवश्यकता आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी केल्यामुळे मागील काही दिवसांपासून चिखलोली रेल्वेस्थानकाच्या भूसंपादनाची प्रक्रिया रखडली होती. मात्र, येत्या ८ सप्टेंबरला स्थानकाच्या जमिनीची मोजणी करण्यात येणार आहे. त्यासाठी जागामालकांना नोटिसाही पाठवल्या आहेत.
- जगतसिंग गिरासे, उपविभागीय अधिकारी, उल्हासनगर