ठाण्यातील अल्पवयीन मुलांशी गैरवर्तन प्रकरण बाल हक्क संरक्षण आयोगाच्या कोर्टात
By जितेंद्र कालेकर | Published: February 23, 2024 08:38 PM2024-02-23T20:38:03+5:302024-02-23T20:38:23+5:30
ठाण्यातील सी. पी. गोयंका शाळेची सहल घाटकोपर येथील किड्झेनिया येथे गेली होती.
ठाणे : ठाण्याच्या सी. पी. गोयंका इंटरनॅशनल हायस्कूलच्या दुसरीतल्या विद्यार्थ्यांसोबत सहलीदरम्यान झालेल्या गैरप्रकाराची गंभीर दखल आता बाल हक्क संरक्षण आयोगाने घेतली आहे. राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा ॲड. सुशीबेन शहा यांनी शुक्रवारी मुंबई कार्यालयात ही बैठक घेतली. या बैठकीसाठी या प्रकरणाशी संबंधित सर्व विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यात शाळा व्यवस्थापन, ठाणे पोलिसांचे तपास अधिकारी, ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रतिनिधी यांच्यासह महिला व बालकल्याण विभागाच्या प्रतिनिधी यांचा यामध्ये समावेश होता. ठाण्यातील या शाळेला भेट देउन या प्रकरणाची त्या सखोल चौकशी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाण्यातील सी. पी. गोयंका शाळेची सहल घाटकोपर येथील किड्झेनिया येथे गेली होती. सहलीदरम्यान बसमधील पुरुष अटेंडण्टने काही विद्यार्थी व विद्यार्थिनींसोबत गैरप्रकार केल्याची तक्रार एका विद्यार्थिनीने केली. त्यानंतर पालकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर शाळा प्रशासनाने कारवाई करीत तीन शिक्षिकांचं निलंबन केलं. त्याशिवाय पोलिसांतही तक्रार दाखल असून संबंधित अटेंडण्टला अटक केली आहे.
या प्रकरणात लहान मुलांच्या हक्कांवर गदा आल्यामुळे राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा ॲड. शहा यांनी या प्रकरणाची दखल घेतली. या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी शुक्रवारी अॅड. शहा यांनी शाळा व्यवस्थापनाचे प्रतिनिधी, या प्रकरणी तपास करणारे पोलीस अधिकारी, ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रतिनिधी आणि महिला व बालकल्याण विभागाचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी सर्व बाजू ऐकून घेतल्या.
शाळेतर्फे सहल आयोजित करण्याचे कंत्राट खासगी कंपनीला दिले तरी संपूर्ण जबाबदारी शाळा व्यवस्थापनाची असते. या प्रकरणातही शाळा व्यवस्थानाने ही जबाबदारी कशी पार पाडली, याची चौकशी हाेईल. पीडित मुलांना समुपदेशनाची गरज असून बालहक्क संरक्षण आयोग आणि महिला व बालकल्याण विभाग त्यासाठी सर्व प्रयत्न करेल, असेही ॲड. शहा यांनी स्पष्ट केले.
शाळेलाही देणार भेट-
याप्रकरणी शिक्षक, पालक आणि पीडित मुलांची भेट घेण्यासाठी सोमवारी ॲड. शहा ठाण्यात या शाळेला भेट देणार आहेत. यावेळी त्या आणखी सखोल चौकशी करतील. शाळा सहल, एकदिवसीय अभ्यास दौरा अशा प्रवासासाठी शाळांसाठी वाहतूक धोरण आखले जाणार आहे. वाहतूक विभागाशी सल्लामसलत करून हे धोरण आखण्यात येईल, असेही ॲड. शहा यांनी स्पष्ट केले.