वडिलांच्या गैरहजेरीत मुलाने केले क्रीडा सभापतींचे पदग्रहण; भिवंडी पालिकेतील अफलातून प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 12:51 AM2018-10-09T00:51:53+5:302018-10-09T00:54:14+5:30
महानगरपालिकेच्या क्रीडा समिती कार्यालयात पदग्रहण समारंभास क्रीडा सभापती गैरहजर राहिल्याने त्यांच्या मुलाने पदग्रहण केल्याचा अफलातून प्रकार भिवंडी महापालिकेत गेल्या आठवड्यात घडला.
भिवंडी : महानगरपालिकेच्या क्रीडा समिती कार्यालयात पदग्रहण समारंभास क्रीडा सभापती गैरहजर राहिल्याने त्यांच्या मुलाने पदग्रहण केल्याचा अफलातून प्रकार भिवंडी महापालिकेत गेल्या आठवड्यात घडला. आश्चर्य म्हणजे, पदग्रहण सोहळ्याची औपचारिकता महापौरांसह स्थायी समिती सभापतींच्या उपस्थितीत पार पडली. विरोधी पक्षासह शहरातील नागरिकांनी या प्रकारावर नाराजी व्यक्त केली असून काँग्रेस-शिवसेना युतीने पालिकेमध्ये हा नवीन पायंडा पाडल्याची चर्चा सुरू आहे.
महानगरपालिकेच्या सभापतीपदी नगरसेविका नाजेमा हदीस अन्सारी यांची निवड झाल्यानंतर पालिकेतील त्यांच्या कार्यालयाचे उद्घाटन महापौर जावेद दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नाजेमा अन्सारी काही कारणास्तव गैरहजर होत्या. त्यांच्या गैरहजेरीत त्यांचा मुलगा इरफान अन्सारी यांनी पदग्रहण करण्याची औपचारिकता पूर्ण केली. काँग्रेसचे महापौर जावेद दळवी आणि शिवसेनेचे स्थायी समिती सभापती मदनबुवा नाईक, सभागृह नेते प्रशांत लाड यांच्यासह काँग्रेस आणि शिवसेना नगरसेवकांनी सभापती नाजेमा अन्सारी यांचा मुलगा इरफान अन्सारी यास पुष्पगुच्छ देऊन त्याचे अभिनंदन केले. वास्तविक, मनपा अधिनियमानुसार, निवडून आलेले सदस्यच पालिकेच्या कामकाजात सहभाग घेऊन पदभार सांभाळतात. त्यांच्या घरातील सदस्य पालिकेच्या कामात हस्तक्षेप करू शकत नाही. मात्र, अनेक महिला सदस्यांचे पती पालिकेत नगरसेवक म्हणून मिरवत कामात हस्तक्षेप करताना दिसतात. मागील आठवड्यातील या घटनेमुळे नगरसेवकांच्या कुटुंबीयांचा पालिकेतील हस्तक्षेप वाढेल.
मनपात निवडून आलेले काही नगरसेवक नियमांची पायमल्ली करत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या मनमानी कारभाराकडे अधिकारीदेखील दुर्लक्ष करत आहेत. आयुक्त मनोहर हिरे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन क्रीडा समिती सभापती नाजेमा हदिस अन्सारी यांचे सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते श्याम अग्रवाल यांनी केली आहे.