बालविकास केंद्रे पुन्हा सुरू
By admin | Published: February 3, 2016 02:07 AM2016-02-03T02:07:31+5:302016-02-03T02:07:31+5:30
कुपोषित बालकांसाठी असलेली व शासनाने निधीचे कारण सांगून बंद केलेली ग्राम बाल विकास केंद्रे सुरू करावीत यासाठी श्रमजिवीने केलेल्या सर्व आंदोलनांना यश आले
सुनील घरत, पारोळ
कुपोषित बालकांसाठी असलेली व शासनाने निधीचे कारण सांगून बंद केलेली ग्राम बाल विकास केंद्रे सुरू करावीत यासाठी श्रमजिवीने केलेल्या सर्व आंदोलनांना यश आले असून राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी नुकतेच आदिवासी विकास विभागाच्या निधीद्वारे ग्राम बाल विकास केंद्रे पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे.
केंद्र शासनाने ग्राम बाल विकास केंद्रांचा निधी बंद केल्याचे कारण सांगून राज्य सरकारने गेल्या आॅगस्ट-२०१५ पासून राज्यातील कुपोषित बालकांसाठी चालविण्यात येणारी व्ही.सी.डी.सी योजना म्हणजेच ग्राम बाल विकास योजनेची केंद्रे बंद केली होती. पालघर जिल्हयात हजारोंच्या संख्येने अतितीव्र आणि तीव्र कुपोषित बालके मृत्यूशी झुंज देत असृताना महाराष्ट्र शासनाने ग्राम बाल विकास केंद्रे बंद केल्याच्या निषेधार्थ श्रमजीवी संघटनेने पालघर जिल्ह्यात तसेच मुंबईही सलग विविध साखळी आंदोलने केली.
पालघरच्या जिल्हा नियोजन बैठकी दरम्यान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सत्याग्रह करून कुपोषणाच्या प्रश्नाकडे पालकमंत्री आणि शासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर संघटनेचे संस्थापक नेते विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे झालेल्या शिष्टमंडळामधे ग्राम बाल विकास केंद्रे (व्ही.सी.डी.सी)सरकार लवकरच सुरू करणार असल्याचे आश्वासन मान मुख्यमंत्र्यानी
दिले होते. मात्र ते बराच काळ अंमलात न आणता, मुंबईतील पंचतारांकीत हॉटेलात कुपोषण
निर्मूलनाविषयीची पंचतारांकीत परिषद मात्र सरकारने आयोजित
केली असता ती लढवय्या
श्रमजीवी कार्यकर्त्यांनी उधळून लावली होती .
> कुपोषित बालकांवरील उपचारासाठी आवाहन
मधल्या काळात श्रमजीवी संघटनेच्या पुढाकारातून जव्हार येथील पतंगशहा कुटिर रुग्णालयात विठु माऊली ट्रस्ट आणि विधायक संसद या संस्थांच्या सहयोगाने कुपोषित बालकांच्या आरोग्य तपासणीसाठी शिबिरही आयोजण्यात आले. २०१६ च्या नवीन वर्ष आरंभीच संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी गंभीर कुपोषित बालकांवरील उपचारासाठी समाजातील सामान्य जनतेला व दात्यांना आवाहन करून जव्हारमध्ये बालसंजीवन छावणी सुरू केली.
आदिवासी बालकांना जीवदान मिळविण्यासाठी एवढी सगळी आंदोलने आणि विधायक प्रयत्न होत आसताना शासनाच्या पातळीवर मात्र कुपोषित बालकांसाठी हालचाली होत नसल्याचे पाहून संघटनेने २६ जानेवारी २०१६ च्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला दि. २५ जानेवारी २०१६ रोजी पालघर, ठाणे, नाशिक आणि रायगड जिल्ह्यात शासनाच्या उदासीन धोरणाबद्द्ल जोरदार आंदोलने केली होती.