उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात आईच्या पोटात बाळाचा मृत्यू, नैसर्गिक बाळंतपण करून महिलेचे वाचविले प्राण
By सदानंद नाईक | Published: July 14, 2023 07:32 PM2023-07-14T19:32:09+5:302023-07-14T19:32:57+5:30
मधुमेह कमी झाल्यास नैसर्गिक प्रसुती अथवा सिजर करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला होता.
सदानंद नाईक, उल्हासनगर : गर्भवती महिलेच्या पोटात बाळाचा मृत्यू होऊन ३ दिवस उलटूनही मध्यवर्ती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी महिलेचा मधुमेह नियंत्रणात आणून नैसर्गिक प्रसूती केली. महिलेचा ५५० पर्यंत गेलेला मधुमेह कमी करून, महिलेची नैसर्गिक प्रसूती करून , तिचा जीव वाचविल्याने डॉक्टरांचे कौतुक होत आहे.
उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात बुधवारी दुपारी उपचारासाठी आलेल्या अस्मिन शेख या महिलेच्या पोटात बाळाचा मृत्यू झाला होता. अंबरनाथ येथील छाया रुग्णालयाने महिलेला मध्यवर्ती रुग्णालयात पाठविले होते. डॉक्टरांनी महिलेची तपासणी केली असता, महिलेचा मधुमेह ५५० पेक्षा जास्त होता. अश्यावेळी गर्भपात अथवा शस्त्रक्रिया करता येत नोव्हतें. तर दुसरीकडे महिलेच्या कुटुंबानी पोटात बाळाचा मृत्यू झाल्याने, विषबाधा होऊ नये म्हणून गर्भपात अथवा शस्त्रक्रिया करण्याची ओरड सुरू केली.
मधुमेह कमी झाल्यास नैसर्गिक प्रसुती अथवा सिजर करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला होता. गुरवारी महिलांच्या नातेवाईकांनी आरोप प्रत्यारोप केल्यावर, महिलेच्या जीविताला धोका नसल्याचे डॉक्टरांनी त्यांना वारंवार सांगितले. इंजेक्शन दिल्याने विषबाधा होणार नाही, असे सांगूनही महिलेच्या काळजीने महिलेच्या नातेवाईकांनी गोंधळ सुरूच ठेवला होता. महिलेचा मधुमेह शुक्रवारी नियंत्रणात आल्यावर, डॉक्टरांनी इंजेक्शन देऊन नैसर्गिक प्रसूती करण्यात यश मिळविले. महिलेची तब्येत धोक्याच्या बाहेर असल्याची माहिती रुग्णालयाचे जिल्हाशल्य चिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांनी दिली. मात्र महिलेच्या नातेवाईकांनी यादरम्यान जो धिंगाणा घातला. याबाबत नाराजी व्यक्त केली. डॉक्टर रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करतात. मात्र काही जण डॉक्टरांच्या कामात जाणीवपूर्वक गोंधळ घालतात. यातून अप्रिय घटना घडण्याची शक्यता असते. अशी प्रतिक्रिया डॉ बनसोडे यांनी दिली. याबाबत महिलेच्या नातेवाईकां सोबत संपर्क केला असता झाला नाही.