लिफ्टच्या खड्ड्यात बुडून मुलाचा मृत्यू; डोंबिवलीतील हृदयद्रावक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 06:21 AM2022-07-06T06:21:43+5:302022-07-06T06:21:58+5:30
बांधकाम सुरु असलेल्या इमारतींच्या ठिकाणी सुरक्षिततेच्यादृष्टीने उपाययोजना आखल्या जात नसल्याने अशा घटना घडतात.
डोंबिवली : पूर्वेकडील सागर्ली परिसरातील एका सात मजली इमारतीच्या लिफ्टसाठी खोदलेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून वेदांत जाधव या सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी २ च्या सुमारास उघडकीस आली. वेदांत हा सकाळी १०.३० वाजता खेळण्याकरिता घराबाहेर पडला. खेळताना चेंडू त्या खड्ड्यात पडला. तो काढताना पाण्यात बुडून वेदांतचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेची मानपाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.
डोंबिवली सागर्ली येथील नरेश स्मृती बंगल्याशेजारील विघ्नहर्ता इमारतीच्या तळमजल्यावर वेदांत हा वडील हनुमंत आणि आजी-आजोबांसोबत राहत होता. याच इमारतीच्या समोर तळमजला अधिक सात मजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्या इमारतीच्या लिफ्टसाठी खोदलेल्या सुमारे आठ फूट खोलीच्या खड्ड्यात पाणी साचले होते. सकाळी खेळण्यासाठी बाहेर पडलेला वेदांत बेपत्ता झाल्याने त्याचा आजूबाजूला शोध घेतला असता दुपारी अडीचच्या सुमारास वेदांतचा मृतदेह खड्ड्यातील पाण्यात तरंगत्या अवस्थेत आढळून आला.
पाण्यात हिरव्या रंगाचा चेंडू तरंगत होता. संबंधित इमारतीचे बांधकाम २०१२ पासून सुरू आहे. संबंधित विकासकावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी होत आहे. दरम्यान, बांधकाम सुरु असलेल्या इमारतींच्या ठिकाणी सुरक्षिततेच्यादृष्टीने उपाययोजना आखल्या जात नसल्याने अशा घटना घडतात.
वेदांतचा होता शेजाऱ्यांना लळा
वेदांतचे वडील हनुमंत हे खाजगी कंपनीत सफाई कामगार म्हणून काम करतात. वेदांतचा लळा घरातल्या व्यक्तींसह शेजारी राहणाऱ्यांनाही लागला होता. वेदांतवर त्यांचा अत्यंत जीव होता. त्याचे लाड पुरवणे, त्याच्याबरोबर खेळणे, गाडीवर फिरायला घेऊन जाणे या सर्व गोष्टी त्यांच्याकडून केल्या जात होत्या. बेपत्ता वेदांतचा मृतदेह आढळून येताच घरातील व्यक्तींसह शेजाऱ्यांनी फोडलेला टाहो ऐकून उपस्थितांचेही डोळे पाणावले.