मधमाशांच्या दंशाने ठाण्यात बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:50 AM2021-07-07T04:50:30+5:302021-07-07T04:50:30+5:30

ठाणे : बकऱ्यांसाठी चारा आणण्यासाठी गेलेल्या राबोडी येथील नबी उल्ला (१५) या बालकाच्या संपूर्ण शरीराला मधमाशांनी दंश केल्याने कळवा ...

Child dies during treatment in Thane due to bee sting | मधमाशांच्या दंशाने ठाण्यात बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

मधमाशांच्या दंशाने ठाण्यात बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

Next

ठाणे : बकऱ्यांसाठी चारा आणण्यासाठी गेलेल्या राबोडी येथील नबी उल्ला (१५) या बालकाच्या संपूर्ण शरीराला मधमाशांनी दंश केल्याने कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. बालकाच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाइकांनी मृतदेह घेण्यास नकार देऊन डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करून रुग्णालयात गोंधळ घातला. अखेर मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात पाठवण्यात आला. तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी मृत बालकाच्या एका नातेवाइकाविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली.

नबी हा इतर मित्रांसह ठाणेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या परिसरात बकऱ्यांसाठी चारा आणण्यासाठी गेला होता. यावेळी झाडांच्या फांद्या तोडताना चुकून कोणाचा तरी धक्का त्या झाडावरील मधमाश्यांच्या पोळ्याला लागला आणि त्या मध्यमाश्यांनी नबी याच्यासह त्याच्या मित्रांनाही दंश केले. ही घटना सोमवारी दुपारी २ ते २.३० च्या सुमारास घडली. ते सर्व जण आपापल्या घरी गेले. नबी याला मध्यमाशांनी अंगभर दंश केल्याने त्याला संध्याकाळी अचानक त्रास जाणवू लागला. त्यानुसार नातेवाइकांनी त्याला खासगी रुग्णालयात नेले. परंतु, कोणीही उपचारार्थ दाखल करू घेतले नाही. अखेर रात्री ९.३० वाजेच्या सुमारास त्याला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आणल्यावर तेथील डॉक्टरांनी दाखल करून तत्काळ उपचारही सुरू केले. मात्र, मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास तब्येत अचानक बिघडल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू हा तेथील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाला असा आरोप करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. नातेवाइकांनी गोंधळ घालून डॉक्टरांच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी एका नातेवाइकाविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत चौधरी यांनी दिली. तसेच दुपारपर्यंत शवविच्छेदनाचा अहवाल आला नसल्याचेही त्यांनी सांगितले.

‘मध्यमाशांनी त्या बालकाच्या अंगभर दंश केले होते. तसेच रात्री ९.३० वाजेच्या सुमारास त्याला रुग्णालयात आणल्यावर तातडीने उपचारही सुरू केले. पण, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे. जे. रुग्णालयात पाठवला आहे. नातेवाइकांनी केलेले सर्व आरोप चुकीचे आहेत.’ - डॉ भीमराव जाधव, अधिष्ठाता, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा, ठाणे

Web Title: Child dies during treatment in Thane due to bee sting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.