गटारसफाईसाठी बालकामगार जुंपले
By admin | Published: May 23, 2017 01:32 AM2017-05-23T01:32:06+5:302017-05-23T01:32:06+5:30
पावसाळ्याच्या धर्तीवर केल्या जाणाऱ्या नालेसफाईच्या कामांना केडीएमसीने अद्याप जोर धरला नसताना सुरू असलेल्या गटार सफाईच्या कामामध्ये मात्र कंत्राटदाराकडून
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : पावसाळ्याच्या धर्तीवर केल्या जाणाऱ्या नालेसफाईच्या कामांना केडीएमसीने अद्याप जोर धरला नसताना सुरू असलेल्या गटार सफाईच्या कामामध्ये मात्र कंत्राटदाराकडून बालकामगारांचा वापर सुरू असल्याचे चित्र डोंबिवलीत पाहयला मिळत आहे. सफाईचे कंत्राट दिले की काम झाले या भूमिकेत असलेल्या केडीएमसी प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे सफाईचे काम वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे आहेत.
केडीएमसीकडून दरवर्षी गटारे आणि नाल्यांची सफाई केली जाते. मात्र या सफाईवर सातत्याने टीका होत असते. पावसाळयापूर्वी, पावसाळयात आणि पावसाळयानंतर अशा तीन टप्प्यात ही कामे केली जातात. या कामांचे कंत्राट दिली जात असल्याने मे महिन्यापासूनच याबाबतच्या निविदा प्रक्रियेला सुरूवात होते. परंतु प्रशासनाकडून निविदा प्रक्रिया उशिराने पार पडल्याने नालेसफाईच्या कामांना विलंबाने सुरूवात झाल्याचा प्रशासनाचा दावा आहे. दरम्यान, याआधी छोट्या-मोठ्या गटारांच्या सफाईच्या कामांना प्रारंभ झाला असून ही कामे जोमाने सुरू आहेत.
गटार सफाईच्या कामांसाठी मागील वर्षी १० प्रभागांमधील १२२ प्रभागांमध्ये २ कोटी ३३ लाख ७७ हजार ९८८ रूपये खर्ची झाले होते. विशेष बाब म्हणजे यंदाही एवढाच खर्च केला जाणार आहे. परंतु या कामांमध्ये बालकामगारांचा वापर केला जात असल्याने ही सफाईची कामे वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. डोंबिवली पूर्वेकडील लोकमान्य टिळक रस्त्यावर हे चित्र सोमवारी दिसले. मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयासमोरील गटारांच्या सुरू असलेल्या सफाईच्या कामांमध्ये बालकामगारांचा सहभाग होता.
डोंबिवलीचे मनसे शहरअध्यक्ष मनोज घरत यांनीही प्रशासनावर टीका केली आहे. कसाऱ्याहून कंत्राटदाराने कामगार मागवले आहेत. यात अल्पवयीन मुले कामासाठी आली आहेत. अधिकाऱ्यांचे यावर कोणतेही लक्ष नाही. त्या मुलांकडे विचारपूस केली असता दहावीचे शिक्षण नुकतेच झाल्याची माहिती त्यांनी दिल्याचे घरत यांनी सांगितले. कमी पैशात मजूर घ्यायचे आणि कंत्राटदाराने मोठया प्रमाणावर पैसे कमवायचे असा हा प्रकार सुरू असून याप्रकरणी तत्काळ चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी घरत यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.