नालेसफाईसाठी जुंपले बालमजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 03:32 AM2018-05-16T03:32:49+5:302018-05-16T03:32:49+5:30
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या नालेसफाईच्या कामात चक्क बालमजुरांसह वृध्द नागरिकांना जुंपण्यात आले आहे.
मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या नालेसफाईच्या कामात चक्क बालमजुरांसह वृध्द नागरिकांना जुंपण्यात आले आहे. गेल्या वर्षीदेखील बालमजुरांना नालेसफाईसाठी राबवण्यात आले होते. हे बालकामगार, अन्य मजुरांकडे काम करताना आवश्यक सुरक्षाविषयक साहित्य नसल्याने त्यांच्या जीवितास तसेच आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
मीरा-भार्इंदरच्या पावसाळापूर्व नालेसफाईचे कंत्राट आशापुरा कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले आहे. दरवर्षी हीच कंपनी नालेसफाईचे काम करते. सध्या शहरांतर्गत गटारांच्या सफाईचे काम सुरु असून भार्इंदर पश्चिम आणि पूर्व भागात या कामाला अल्पवयीन मुला-मुलींना जुंपल्याचे उघड झाले आहे. त्यांच्यासह काही वयोवृध्दही नालेसफाई करताना दिसत आहेत. पण यातील कोणाकडेही गमबूट, हातमोजे, मास्क आदी सुरक्षा साहित्य दिसत नाही.
अनेकदा बंदिस्त नाल्यात घातक वायू असतात. शिवाय आत प्रचंड दुर्गंधीयुक्त गाळ, सांडपाणी तसेच काचेचे तुकडे, पत्रा, दगड आदी असतात. त्यामुळे सुरक्षाविषयक साहित्याविना नालेसफाईचे काम प्रसंगी जीवावर बेतू शकते. आरोग्यावरही घातक परिणाम होऊ शकतो. काही वर्षांपूर्वी गणेश निंबाळकर नावाचा कामगार नालेसफाईदरम्यान गुदमरुन बुडून मरण पावला होता. या कामासाठी मजुरांची मोठी चणचण असल्याने जसे मिळतील तसे मजूर गोळा करून आणले जातात. त्यांना आवश्यक सुरक्षाविषयक साहित्य पुरवण्याची जबाबदारी, त्याच्या जीविताची जबाबदारी पालिका आणि ठेकेदाराची असते. या कामात बालकामगारांना राबवण्यास मनाई आहे.
>प्रशिक्षणाचा अभाव
महत्वाचे म्हणजे नालेसफाई करताना काय काळजी आणि खबरदारी घ्यावी, नालेसफाई कशी करावी, आदींचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. परंतु अशी कोणतीच खबरदारी ठेकेदार किंवा महापालिका घेताना दिसत नाही.
बालमजूर, वृध्दांना नालेसफाईला जुंपतानाच मजुरांना आवश्यक साधने- साहित्यही पुरवले जात नसल्याने या प्रकरणी ठेकेदार आणि महापालिका अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जात आहे.