मूल पहिल्यांदाच शिकताना...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 01:22 AM2019-12-13T01:22:43+5:302019-12-13T01:22:59+5:30
मुलांच्या शिकण्याची आणि शिकवण्याची घाई ही शिक्षकांपेक्षाही पालकांना अधिक असल्याचे आजच्या काळात प्रकर्षाने दिसून येते.
- संतोष सोनावणे
आजचे शिक्षण अतिस्पर्धात्मक झाले आहे. त्यामुळे मुलाचे भविष्य आणि त्याच्याविषयी असलेली काळजी व प्रेम याचबरोबर त्याच्या शिकण्यात पालकांनी वेळोवेळी नक्कीच लक्ष द्यायला हवे, मात्र ते लक्ष देताना त्यामागील पालकांची भूमिका आणि विचार खूप महत्त्वाचा असतो. कारण प्रत्येक मूल हे वेगळे असते. अशावेळी आपल्या मुलाला आपण लहानपणापासून चांगले ओळखत असतो. त्याची आवड, त्याची क्षमता, त्याचे मन, त्याची बुद्धी या सगळ्या बाबी विचारात घेऊन पालकांनी आपली भूमिका बजावायची असते. केवळ कुणाशी तरी स्पर्धा, खोटी प्रतिष्ठा, अति महत्त्वाकांक्षा, अशा मानसिक आणि सामाजिक दबावाखाली येऊन आपल्या पाल्याचा बळी देऊ नये. त्याउलट त्याचा कल लक्षात घेऊन त्याला समजून घेऊन त्याच्या भविष्यात येणाºया समस्यांना तोंड देण्याकरिता आत्मविश्वास हा खरा पालकांनी द्यायला हवा. शाळा ही प्रमाणपत्र देऊन तांत्रिक बळ देऊ शकते, परंतु विश्वासाचे बळ हे मुलांना घरातून पालकांकडून मिळणे खूप गरजेचे आहे.
मुलांच्या शिकण्याची आणि शिकवण्याची घाई ही शिक्षकांपेक्षाही पालकांना अधिक असल्याचे आजच्या काळात प्रकर्षाने दिसून येते. मुळात लहान मुलांची अर्थात पूर्व प्राथमिक शिक्षणाबाबत निश्चित अशी व्यवस्था आज तरी उपलब्ध नाही. त्यामुळे काही मुलभूत प्रश्न आज निरुत्तरीत आहेत. जसे लहान मुलांना पूर्वप्राथमिक शिक्षण कोणत्या वयात सुरु करावे?, पूर्वप्राथमिक शिक्षणाचे टप्पे कोणते?, पूर्वप्राथमिक शिक्षणाचा वयोगट कोणता? पूर्वप्राथमिक शिक्षणाचा शास्त्रोक्त अभ्यासक्रम कोणता? आणि किती वर्षाचा? या साºया प्रश्नाचा मागोवा न घेता आज पालक आपल्या कोवळ्या जीवांना अगदी अडीच वर्षापासून दाखल करण्याची घाई करताना दिसत आहेत. आज सर्व प्रकारच्या माध्यमाच्या शाळांमधून यामध्ये एकवाक्यता नाही. साधारणपणे इयत्ता पहिलीपासून मान्यताप्राप्त शाळा आणि अभ्यासक्रमाची सुरुवात होते. तिथेही शासनाने स्पष्ट सूचना देवूनही पहिलीला प्रवेश हा पाच वर्ष की सहा वर्ष या गोंधळात पालक दिसून येतात. पाचव्या वर्षी दाखल केल्याने मुलाचे शिकणे योग्य टप्प्यावर सुरु होते की सहाव्या वर्षी दाखल केल्याने त्याचे एक वर्ष वाया जाते? असे काही बाळबोध प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जातात.
पियाजे यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांपैकी एक म्हणजे ‘द ग्रास्प आॅफ कॉन्शसनेस’ (-जाणिवेवरची पकड). या पुस्तकात त्यांनी मूल हे आपल्या वेगवेगळ्या क्रिया कशा करते याबाबतची मुलाची नेमकी समाज कशी असते यावर भाष्य केले आहे. उदारहणार्थ, घरातील जुन्या खोक्याच्या साह्याने दोरा बांधून गाडी गाडी खेळ खेळतात. त्याकरिता ते मुलं ज्याप्रकारे खेळाची आणि साहित्याची बांधणी करते. इत्यादी या क्रि या म्हणजे मुलाची विचारप्रक्रि या. या क्रि या नेमक्या कशा केल्या जातात, असे मुलांना वाटते हे पियाजेंनी प्रथम समजून घेतले.
त्याकरिता त्यांनी मुलांसोबत चर्चा, गप्पा, मुलाखती या माध्यमातून मुलाला समजून घेतले. या प्रक्रि येतून पियाजे यांच्या असे निदर्शनास आले की, एखादी क्रिया योग्य पद्धतीने किंवा यशस्वीपणे करायला मुलांना जमले तरी त्याविषयीचे त्याचे मत किंवा त्यांनी दिलेले स्पष्टीरकरण अचूक नसते. साधारणपणे चार वर्षे ते कुमार वयापर्यंतची मुले या क्रि यांची निरनिराळी स्पष्टीकरणे देताना दिसून येतात. या मुलांपैकी साधारणपणे अकराव्या- बाराव्या वर्षापर्यंत मुलांच्या समजेचा आणि जाणीवेचा विकास अधिक चांगल्या प्रकारे झालेला दिसून येतो. या वयाची मुले प्रत्येक क्रियेबाबत पडताळणी करू शकतात, तसेच सिद्धांताच्या स्वरूपात त्यांची मांडणी करू शकतात. काही गोष्टी कशा घडतात हे नेमके समजण्यासाठी मुलाला निरनिराळ्या साहित्याच्या आधारे मदत होत असते, या अनुभवातून मुलांची समज आकारायला लागते.
खरं म्हणजे पहिलीचा प्रवेश हा मुलाचे वय, त्याची समज, त्याचा बौद्धिक विकास, शारीरिक विकास याचा संबंध आणि पहिलीचा अभ्यासक्रम अर्थात शिक्षण याचा विचार व्हायला हवा. मात्र हे पालक ध्यानी घेत नाहीत. मुळात मुलांना लवकर शाळेत घातल्याने तो लवकर शिकेल या गैरसमजात पालकांनी राहू नये. मुलांना तुम्ही जितक्या लवकर शाळेत घालाल तितके उशिरा मुलांच्या शिकण्याची प्रक्रि या होते. कारण मुलांच्या शिकण्याचे एक शास्त्र आहे, पद्धत आहे.
तरीही दुर्दैवाने आज मुलांना लवकर लेखन आणि वाचन येणे याला अधिकाधिक प्राधान्य दिले जाते. त्यानुसार शाळेत लेखन- वाचनाची घाई केली जाते. विचार करा लेखनाकरिता आपल्या या कोवळ्या जीवाची बोटे, हात त्याचे स्नायू खरंच तयार आहेत का? पेन, पेन्सिल योग्य पद्धतीने ते धरू शकत आहेत का? वहीच्या ओळी आणि त्यांचे लेखन यात त्यांना समन्वय साधता येतो का? वाचन करण्याकरिता त्यांचे डोळे स्थिरावतात का/ या सगळ्या शारीरिक क्रिया एकाच ठिकाणी बसून कोणीतरी सांगत आहे म्हणून करत राहणे हे त्या जीवाला
मानिसकदृष्ट्या शक्य असते का?
थोडक्यात शिकणे या नैसर्गिक प्रक्रियेत घाई करणे किंवा आपल्या म्हणण्याने दुसºयाने शिकणे हे अन्यायकारक असते. त्यामुळे मुलांच्या शिकण्याची पालकांची घाई ही त्या मुलाच्यावर अन्यायकारक व त्यांच्या खेळण्या, बागडण्याच्या वयाचे शोषण करण्यासारखे आहे.